चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण ७: पंचाग्नी धुनी

प्रकरण ७: पंचाग्नी धुनी

“याजसाठी जप, याजसाठी तप” (तु. म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला. या सर्व विधींना बालदास महाराज हजर असत. विधींच्या वेळी पडेल ते काम बालदास महाराज आनंदाने करीत असत.

पंचाग्नी धुनी म्हणजे चोहोबाजूंनी चार अग्नीकुंड प्रज्वलित करून मध्यभागी स्वतः बसणे, आणि सूर्याग्नी हा पाचवा अग्नी मानला जातो.

पंचाग्नी विधी अनेक ठिकाणी भक्तिभावाने पार पडले.

पहिला पंचाग्नी विधी

पहिला पंचाग्नी धुनीचा विधी सौते गावाच्या उत्तरेस असलेल्या बहिरीच्या पठारावर पार पडला. या पठारावर बहिरी देवाचे देऊळ आहे. याच ठिकाणी पंचाग्नी धुनीचा पहिला कार्यक्रम झाला. हा विधी पाहण्यासाठी संपूर्ण गाव लोटला होता.

दुसरा पंचाग्नी विधी

दुसरा पंचाग्नी विधी सावर्डे येथील इंजाई देवीच्या समोर झाला. या विधीसाठी सावर्डे परिसरातील मोठ्या प्रमाणात भक्तगण जमले होते. अत्यंत भक्तिभावाने आणि अंतरीच्या श्रद्धेने हा कार्यक्रम मोठ्या भारदस्तपणे पार पडला. म्हातारी-कोतारी, स्त्री-पुरुष, अनेकजण गाड्या जुंपून हा अग्निविधी पाहण्यासाठी आले होते. सर्वत्र जत्रा भरल्यासारखे वातावरण होते.

तिसरा पंचाग्नी विधी

तिसरा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम वारण खोऱ्यातील साताळी येथे झाला. साताळीचे पठार भेडसगावच्या उत्तरेस आहे. येथेही मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

या ठिकाणी एक विशेष घटना घडली. ऊसाच्या फडात काम करणारे चाळीस-पन्नास फडकरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वेळात वेळ काढून रात्री आले. ती भोजनाची वेळ होती. सद्गुरु महाराजांनी सर्वांना आग्रहाने जेवण्यास सांगितले, आणि सर्वांनी तो आग्रह मान्य केला.

सद्गुरु माऊलींच्या हातचे जेवण मिळणार म्हणून सारे उत्सुक झाले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी फक्त एक ओंजळ तांदूळ एका छोट्याशा पातेल्यात शिजत ठेवला. थोड्याच वेळात भात तयार झाला.

“जेवायला बसा,” असे महाराज म्हणताच साऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले. एकजण हळूच म्हणाला,
“अरे खंडू, एवढासा भात आणि आपण इतके लोक कसे जेवणार?”

त्यावर खंडू म्हणाला,
“तसं बोलू नकोस. प्रसाद पोटभर खायचा नसतो. थोडा-थोडा प्रसाद घेऊन उठायचं.”

महाराजांनी पाने वाढली. सर्वजण जेवू लागले. महाराज जसा भात वाढत होते, तसा पातेल्यात भात परत तसाच भरलेला दिसत होता. साऱ्यांचे लक्ष त्या पातेल्याकडेच लागले होते.

महाराज म्हणाले,
“अजून थोडा-थोडा भात घ्या.”

तेव्हा त्या फडकर्‍यांमधील म्होरक्या म्हणाला,
“महाराज, आता पोट फुटायला झालं आहे. आम्हाला पानावरून उठायची परवानगी द्या.”

महाराज हसून म्हणाले,
“तुमची इच्छा.”

सारे फडकरी पानावरून उठले. महाराजांना साष्टांग नमस्कार घालून पुन्हा आपल्या ऊसाच्या फडात कामाला गेले.

हा प्रसंग वाचताना सामान्य माणसाला प्रश्न पडेल की महाराजांच्या पातेल्यात भात परत-परत कसा वाढत होता. मोठ्या योगींना योगसिद्धीच्या बळावर अशा गोष्टी साध्य होऊ शकतात. महान योग्यांपुढे पंचमहाभूते लीन होतात.

असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
तुका म्हणे

चौथा पंचाग्नी विधी

चौथा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम उद्गिरी येथे झाला. उद्गिरी हे ठिकाण घनदाट जंगलात आहे. निसर्गरम्य परिसरात, भोवतालच्या करवंदीच्या जाळींना साक्ष ठेवून भक्तगणांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. या वेळी सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी दगडाला पाझर फोडून दाखविला, आणि सर्व भक्तगण अचंबित झाले.

पाचवा पंचाग्नी विधी

पाचवा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम विशाळगडाच्या पायथ्याशी झाला. या विधीच्या वेळी सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांना सौते गावी जाऊन रातोरात गायीचे दूध आणण्यास सांगितले.

विशाळगड ते सौते हे अंतर सुमारे ४० किलोमीटर आहे. एवढे अंतर पार करून बालदास महाराज दोन ते अडीच तासांत गायीचे दूध घेऊन परत आले.

रात्री जात असताना विशाळगडाच्या अलिकडे वाटेत एक ढाण्या वाघ बसलेला होता. बाजूने जाण्यास मुळीच रस्ता नव्हता. तरीही बालदास महाराज निर्भयपणे त्या वाघाच्या जवळून गेले. वाघाने त्यांना काहीही इजा केली नाही.

अशा प्रकारे वाघाच्या तावडीतून सुटून गायीचे दूध घेऊन बालदास महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या सहवासातील सर्व भक्तगण हे पाहून आश्चर्यचकित झाले. बालदास महाराजांच्या चालण्याच्या वेगाचे, धैर्याचे आणि जंगलातून येण्याच्या धाडसाचे सर्वांनाच नवल वाटले.