चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: अध्याय १: माता-पिता, जन्म व बालपण

← मागील पुढील →

अध्याय १: माता-पिता, जन्म व बालपण

"पवित्र ते कुळ, पावन तो देश" (तु. म.)

योगीराज प. पू. बालदास महाराज यांच्या जन्मस्थानाचा मान शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द या भाग्यवान खेडेगावास मिळतो. म्हणजेच महाराजांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला.

सावर्डे हे खेडेगाव म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांचे गाव—कष्ट करून पोटाची भाकर मिळवणाऱ्या कष्टकऱ्यांचे गाव. अशा गावात महाराजांचा जन्म झाला, म्हणजे जणू काय करवंदाच्या जाळीत गुलाब हसल्याचाच अनुभव!

माता-पिता

महाराजांच्या वडिलांचे नाव विठोबा होते आणि मातोश्रींचे नाव जिजाबाई होते. गरीब घराण्यातील ही गरीब माणसे असली, तरी स्वभावाने मात्र राजासारखी होती. सौते हे त्यांचे वास्तव्याचे गाव. त्या गावात ती दोघेही गुणी म्हणून ओळखले जात. कुणाची लांडीलबाडी त्यांनी कधीच केली नाही. कोणाचे पसाभर आणलेले धन परत न देता बुडवले, असे उदाहरण त्या गावात आजही शोधून सापडणार नाही.

शेती करून उपजीविका करणारी, पण भक्तीभावाने जगणारी अशी ही माता-पित्यांची जोडी होती. पंढरपूरचा पांडुरंग हा त्यांचा आराध्य दैवत. आषाढी-कार्तिकी वारीस पंढरीला जाणे त्यांचे नित्याचेच होते.

“पंढरीचा पांडुरंग सर्व काही करतो,” अशी त्यांची पक्की श्रद्धा होती.

जन्म देणे, तारणे आणि मारणे—हे सर्व काम पतितपावन पांडुरंगच करतो, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाची आरती कधीही चुकायची नाही. देवाची पूजा व आरती केल्याशिवाय ते कधीच जेवत नसत.

वडील विठोबा

प. पूज्य बालदास महाराजांचे वडील विठोबा परिस्थितीने जरी गरीब असले, तरी मनाने फार विशाल होते. त्यांचे मन सात्त्विक, सालस व श्रद्धासंपन्न होते. महाराज म्हणत,

“माझे वडील फार चांगले होते. ते धार्मिक होते. विठ्ठलाभोवती त्यांनी भक्तीभावाची माळ गुंफली होती.”

ते चिलीम ओढत असत. चिलीम ओढताना जाणाऱ्या-येणाऱ्यांना ते म्हणत,
“या मारा एक झुरका आणि पळा आपल्या कामाला. चिलमीचा दम कामाला जोम देतो होय का नाय?”
ओढणारा ओढत-ओढतच म्हणायचा,
“होय, होय, अगदी खरं हाय तुमचं!”

विठोबांचे औदार्य फार मोठे होते. आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्याला दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. कुणी खुरपं मागो, कुणी वैरणीसाठी दोरी मागो, कुणी शेतीचे औजार मागो—सर्व गोष्टी देण्यात ते सदैव उत्सुक असत.

माता जिजाबाई

प. पूज्य महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाई होते. जिजाबाईंचे माहेर सावर्डेच होते. अंगापिंडाने चांगल्या असलेल्या जिजाबाईंचे माहेरचे व सासरचे नाव एकच होते. सौ. जिजाबाई व विठोबा यांचे लग्न बालपणीच झाले होते—त्या काळी बालविवाहाची पद्धत होती.

सौ. जिजाबाई पतीशी पूर्णपणे एकरूप झालेल्या होत्या. तिची मुद्रा पतीच्या मुद्रेत लोप पावली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ती एक महान पतिव्रता होती. सतत उद्योगाची कास धरणारी, कष्टकरी स्त्री होती. तिला वावगे खपायचे नाही. सर्वांनी चांगले वागावे, चांगले बोलावे—असे तिचे मत होते.
“देव जे देतो ते सर्वांनी वाटून खावे,” ही तिची शेजार-पाजाऱ्यांना दिली जाणारी शिकवण होती.

नवऱ्याचा भक्तिमार्ग तिला प्रिय होता. गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी यांसारख्या संतांनी संसार करून परमेश्वर साधला—हेच तत्त्व तिला मान्य होते. पोटाचे काम करतानाच तिने परमेश्वराची भक्ती केली. मोटेवर अभंग म्हणणाऱ्या विठोबाला ती कधी-कधी साथ देई व चुकलेले सुधारून देई. नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून तिने आयुष्य व्यतीत केले. खरोखरच ती महान पतिव्रता होती.

आपल्या अवतीभोवती जे दीन-दुबळे होते, त्यांना आपले मानणारी ही सात्त्विक स्त्री होती. दुसऱ्यांचे सुख पाहून तिला आनंद होत असे, आणि दुःख दिसले की तिच्या मनात कणव निर्माण होत असे.

जन्म

अशा मातापित्यांच्या पोटीच महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंना दिवस गेले असताना त्यांना एक स्वप्न पडले—

आपण बाळंत होऊ लागलो आहोत. प्रसूतीच्या वेदना भयंकर होत आहेत. शेजारी-पाजारी लोक गप्प बसले आहेत. कदाचित मी मरणार असे त्यांना वाटू लागले आहे. पुढील सोपा लोकांनी भरलेला आहे. वेदना वाढताच मी बेशुद्ध पडले आहे. काही वेळाने शुद्धीवर आले, तेव्हा सुईण म्हणाली,
“झाली रिकामी, पण ह्या पोरातून सारा प्रकाशच कसा निघतोय! पायाकडून आला म्हणून आईला फार ताप झाला.”

भक्तहो, महाराजांचा जन्म या स्वप्नाप्रमाणेच सन १९०५ साली झाला.

बालपण व शिक्षण

सात-आठ वर्षांनंतर बालदास महाराज सौते येथे शाळेत जाऊ लागले. लहानपणी त्यांना सर्वजण बाळू म्हणून हाक मारत. महाराज सर्वांचे लाडके होते. शाळेत शिकत असतानाच ते आई-वडिलांना मदत करत. रानात जाणे, भांगलणे, खुरपणे, मोट हाकणे, ऊसाचा पाला काढणे, ओझे आणणे—अशी सर्व शेतीची कामे महाराज करत.

सौते हे एक ग्रामीण खेडेगाव असल्याने तेथील मुलांना शेतीची कामे करणे अपरिहार्यच होते. शेती हाच तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे महाराजांनाही शेतीची कामे करावी लागत.

महाराज तिसरी-चौथीपर्यंतच शिकू शकले. त्यानंतर सौते गावी शिक्षणाची सोय नव्हती. कदाचित सोय असती तर महाराज अधिक शिकलेही असते.

शाळेत असताना एक गमतीशीर प्रसंग घडला. बे-चा पाढा सुरू होता. सर्व मुले गुरुजींच्या मागे पाढा म्हणत होती; पण महाराजांचे लक्ष त्या वेळी पाढ्याकडे नव्हते. ते पाटीवर पेन्सिलीने “श्रीराम, श्रीराम” असे लिहीत बसले होते. गुरुजी रागावून म्हणाले,
“तुला शाळेचे शिक्षण महत्त्वाचे की देवाचा जप?”
महाराज उत्तरले,
“मला दोन्हीही महत्त्वाचे आहेत.”

हे उत्तर ऐकून गुरुजी गप्प झाले आणि म्हणाले,
“मग दोन्हीही गोष्टी एकाच वेळी शिक, बाबा.”

अकरा-बारा वर्षांच्या दरम्यान महाराजांनी शाळेला रामराम ठोकला. ते जनावरे सांभाळू लागले व शेतीची कामे करू लागले. कधी महाराज मोटेच्या मकराला पुस्तक बांधत आणि त्यातील अभंग पाठ करत. एकदा तर लोकांनी अभंगगाथा मकराला बांधलेली पाहिली होती.

मोटेच्या नाडीवर पालथे पडून महाराज मोट हाकत. पुढे जाताना अभंग पाठ करत आणि मकराजवळ आल्यावर बांधलेल्या गाथेतून अभंग पाहत. अशा प्रकारे महाराजांनी बालवयातच वाचनाची सवय लावली.

महाराजांचे औपचारिक शिक्षण जरी कमी झाले असले, तरी ते अत्यंत सुसंस्कृत होते. घरातील धार्मिक वातावरण, त्यागाचे संस्कार, जनसेवेची शिकवण, सामुदायिक पद्धतीने साजरा होणारा विठ्ठलाचा उत्सव, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा यांचे श्रवण—या सर्वांमुळे ते बहुश्रुत झाले.

जो जो जयाचा घेतला गुण
तो तो मी गुरु केला जाण
गुरुशी आले अपारपण
संपूर्ण जग गुरु दिसे!

हा दत्ताचा गुरुविषयीचा अनुभव होता, आणि तोच अनुभव महाराजांच्या चित्तात बालपणापासून रुजत गेला.