चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण ५: सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी भमोपविलेली पशुपालन सेवा

प्रकरण ५: सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी भमोपविलेली पशुपालन सेवा

"भूतदया – गायी-बैलांचे पालन" (तु. म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराज सौते गावी आले तेव्हा ते एकटे आले नव्हते. त्यावेळी त्यांच्या बरोबर चाळीस गाई आणि चार बैल होते. या सर्व जनावरांची व्यवस्था त्यांनी आमच्या बालदास महाराजांवर सोपवली होती. सौते गावी चाळीस खणांचे प्रचंड छप्पर उभारून त्यात या जनावरांची जोपासना करण्याचे काम आमचे महाराज करू लागले.

सद्गुरूंनी आपला हा चाळीस गाईंचा व चार बैलांचा गोतावळा महाराजांकडे का दिला होता, हा प्रश्न भक्तांच्या मनात येणे साहजिकच आहे. याचे कारण असे की सद्गुरूंना महाराजांवर मोठा विश्वास होता.

बालदास महाराज चाळीस गाई व चार बैलांची सेवा करीत असत. एका व्यक्तीने हे सर्व करणे ही किती कठीण गोष्ट होती, हे विचार करण्यासारखे आहे. चाळीसपेक्षा अधिक जनावरांचे दररोज किमान चाळीस पाट्या शेण निघत असे. ते शेण काढून गारीत (खड्यात) टाकणे ही सोपी गोष्ट नव्हती, आणि हे काम महाराजांनी कित्येक दिवस अविरत केले.

चव्वेचाळीस जनावरांचा कळप घेऊन महाराज दररोज बादयाच्या जंगलात जात. बहिरीच्या पठारावर जनावरे राखत असताना ते वाचन करीत. बहिरीच्या पठारावर असलेल्या बहिरीदेवाजवळ महाराज जसे लहानपणी बसत, तसेच तरुणपणीही बसत. वाचन व पाठांतर यावर त्यांचा मोठा भर होता. ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथी, रामायण, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप इत्यादी ग्रंथांचे वाचन महाराज मोठ्या आत्मीयतेने करीत. त्यांनी आपला सारा जीव या ग्रंथांच्या वाचनात गुंतवला होता. “ग्रंथ हेच आपले गुरु” असे ते सर्वांना सांगत.

“ग्रंथावलोकन येतसे, मनुजा चातुर्य असे,” हे महाराज आवर्जून सांगत आणि स्वतः त्याचे अनुकरणही करीत. काहीजण महाराजांना “जंगलाचा राजा” म्हणत. कारण सर्वांत आधी जंगलात पाय ठेवणारे महाराज असत आणि परतताना शेवटचे निघून जंगलाला रामराम करून येत.

रात्र गावात आणि दिवस जंगलात असा त्यांचा नित्यक्रम झाला होता. जंगलातील अनेक वनस्पती ते खात असत. ज्या वनस्पती जनावरे खात, त्या त्या वनस्पती ते निर्धास्तपणे खात.

जनावरांसाठी महाराज ओढ्याचे पाणी अधिक पसंत करीत. बादयाचा ओढा हा त्यांच्या गाई-बैलांचा आवडता ओढा होता. महाराजांनाही त्याच ओढ्याचे पाणी उत्तम वाटत असे. जनावरांच्या अंगावर तेच पाणी मारून महाराज त्यांचे शरीर चकचकीत करीत. महाराजांच्या बहुतेक सर्व गाई पांढऱ्या रंगाच्या होत्या आणि बैलही तसेच पांढरे होते. त्यामुळे त्यांच्या कातडीत चांदीसारखी झळाळी दिसत असे.

उन्हाळ्यात ओढ्याचे पाणी आटले की महाराज जनावरांना रांजून या ठिकाणी पाणी पाजत. रांजून येथे चोवीस तास पाणी असते. पूर्वीच्या काळी भीमाने येथे आपला गुडघा रुतवला होता, अशी दंतकथा आहे. रांजूनच्या पश्चिमेला धावट्याचे जंगल असून, त्या जंगलातील जंगली जनावरे आजही येथे पाणी पिण्यास येतात.

रांजूनचे पाणी नेहमी पांढरेशुभ्र दिसते. ते थंडगार असून मनाला आगळे समाधान देते. पावसाळ्यात येथील कुंडासारखा भाग पाण्याच्या प्रवाहात बुडून जातो, तर उन्हाळ्यात या ठिकाणचे खरे वैभव दिसते. सभोवती प्रचंड दगडांच्या सान्निध्यात हे ठिकाण गुंतलेले भासते. भोवतालची हिरवीगार सृष्टी येथे डोकावते, तेव्हा दृश्य अतिशय मोहक वाटते. दुपारच्या वेळी तर सूर्य जणू स्वतःच त्या थंडगार कुंडात बुडतो. सूर्याचे प्रतिबिंब रांजूनच्या पाण्यात पडते, तो देखावा अविस्मरणीय असतो.

या सुंदर ओढ्याच्या रमणीय वातावरणात महाराज रात्र सोडली तर दिवसभर असत. महाराजांना निसर्ग फार प्रिय होता. “निसर्ग भरभरून देतो,” असे ते म्हणत. याठिकाणी विं. दा. करंदीकरांची ‘घेता’ ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही—

देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
हिरव्या पिवळ्या माळावरून | हिरवी पिवळी शाल घ्यावी |
सह्याद्रीच्या कड्याकडून | छातीसाठी ढाल घ्यावी |
वेड्यापिशा ढगाकडून | वेडेपिसे आकार घ्यावे |
रक्तामधल्या प्रश्नांसाठी | पृथ्वीकडून होकार घ्यावे |
उसळलेल्या दर्याकडून | पिसाळलेली आयाळ घ्यावी |
भरलेल्या महिमेकडून | तुकोबाची माळ घ्यावी |
देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस | देणाऱ्याचे हात घ्यावे |

या कवितेत कवीने जसा निसर्ग गुरु मानला आहे, तसेच महाराजही मानत. निसर्गाकडून दातृत्व हा गुण माणसाने घेतला पाहिजे, असे त्यांचे मत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून महाराज धडे घेत आणि ते इतरांना सांगत.

एवढा मोठा जनावरांचा कळप सांभाळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील, याची कल्पना ज्यांच्या दावणीला जनावरे आहेत त्यांनाच येऊ शकते. महाराज सातशे पेंड्यांचे वाळके गवत डोंगराच्या उतारावर असलेल्या एका प्रचंड दगडावरून स्वतः उचलून पाठीवर घेत आणि डोंगर उतरून खाली आणत. सातशे पेंड्यांचे गवत म्हणजे एक गाडीभर गवत होय. महाराजांनी एवढी प्रचंड ताकद कमावली होती.

उन्हाळ्यात महाराज जंगलात जाऊन सुमारे एक लाख गवत काढून ठेवत. ते गवत स्वतः सौते गावात आणून छपरात रचत आणि पावसाळ्याची तयारी करीत. पावसाळ्यात त्यांना कधीही वैरणीचा तुटवडा जाणवत नसे. चव्वेचाळीस जनावरे वैरण खाऊनही अंदाजे दहा-वीस हजार गवत शिल्लक राहत असे. एवढा मोठा जनावरांचा परिवार महाराजांनी बिनतक्रार सांभाळला.

चार बैलांची नावे अशी होती—राजा, बाळया, मदन आणि सागर. सागर हा समुद्रासारखा प्रचंड पिंडाचा होता. राजा हा खऱ्या राजासारखा रस्त्याने डुलत चालत असे; त्याच्याकडे सगळी ऐट आणि बाणा होता. बाळया स्वच्छ आणि साधा होता. मदन मधासारखा गोड; त्याची हालचाल मादक व मोहक होती.

साऱ्या कळपाची पुढारीण लक्ष्मी नावाची गाय होती. ती वांझोटी होती. वांझ गायीला सहसा मान दिला जात नाही; पण महाराजांना ती फार प्रिय होती. त्यांनी तिलाच कळपाचे पुढारपण दिले आणि तिचे नावही लक्ष्मीच ठेवले. कळपातील दुसऱ्या गायीचे नाव त्यांनी सोनी ठेवले होते. तिचे गुण सोन्यासारखेच आहेत, असे महाराज म्हणत आणि “माझी सोनी फारच चांगली आहे,” असा उल्लेखही करीत.

महाराज जनावरांच्या आत्म्यास देव मानत. आपला आत्मा आणि जनावरांचा आत्मा एकच आहे, असे ते मानत. “रेड्यामुखी वेद” म्हणवली जाणारी ज्ञानेश्वरी महाराज या संदर्भात सांगत. परमेश्वर सर्व भूतांत भरून राहिला आहे, ही जाणीव ते सर्वांना करून देत. एखादी गाय आजारी पडली की महाराज त्वरित झाडपाल्याचा उपाय करीत.

कुठल्यातरी झाडाची मुळे आणून उगाळून औषध देत. आयुर्वेदिक औषधांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. एकदा सोनी गाय तापाने आजारी पडली. महाराज रात्रभर तिच्याजवळ बसून राहिले. हरणाचे शिंग गार पाण्यात दगडावर उगाळून त्याचा लेप तिच्या अंगावर लावत ते उजाडेपर्यंत जागे होते. सकाळी डोंगराआडून सूर्य डोकावताच सोनीला आराम पडला. महाराजांना फार आनंद झाला. तोंड धुऊन त्यांनी चहा घेतला आणि छपरात येणाऱ्या प्रत्येकाशी आनंदाने बोलू लागले. गाईचा आराम म्हणजे जणू महाराजांचाच आराम होता, असे भेटणाऱ्यांना वाटत असे.

महाराजांचा गोतावळा म्हणजे ही सारी जनावरेच होती. शेणमूत काढणे, आजारपणाची काळजी घेणे, पोटाची व्यवस्था करणे, आवडीनिवडी पाहणे—या सगळ्या कामांतच त्यांचा अहर्निश वेळ जात असे. या गोतावळ्यापलीकडे त्यांचे वेगळे असे जीवन नव्हते. अंतःकरणात अध्यात्माचा गाभारा फुलत असतानाच सद्गुरु श्रीकृष्ण नेर्लेकर महाराजांनी ही मोठी कामगिरी त्यांच्या खांद्यावर सोपवली होती.