चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण ३: पंढरीतून सौते गावी परत

प्रकरण ३: पंढरीतून सौते गावी परत

"शरण शरण हळुमंता" (तु. म.)

महाराजांनी दीर्घकाळ पंढरीत वास्तव्य केल्यानंतर ते सौते गावी परतले. सौते गावी आल्यानंतर महाराज हनुमानाच्या देवळात राहू लागले. त्याच देवळात ते रात्रंदिन देवध्यानात रमू लागले. काही लोक महाराजांना देवभक्तीच्या मार्गावर लागल्यामुळे चांगले म्हणू लागले, तर काही लोक त्यांची चेष्टा करू लागले.

काही बहाद्दर म्हणू लागले,
“विठोबा केसऱ्याचं पोरगं पंढरीला राहून आलंय. कुठं कुठं भमक्या मारत फिरलंय आणि आता हनुमानाच्या देवळात बसलंय. बा-नं लगीन करावयाचं ठरवलं होतं, तोपर्यंत पळून गेलं. लेकाचा कशाला आलाय ह्या गावत तोंड घेऊन, कुणास ठाऊक. जिकडं फुडा तिकडं मुलुख थोडा म्हणून बाहेर पडलेलं पोरगं परत कशाला आलंय, कुणास ठाऊक!”

परंतु काही लोकांना मात्र महाराज पंढरीतून काहीतरी घेऊन आले आहेत, याची जाणीव झाली होती. कारण त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि ज्ञानात स्पष्ट फरक जाणवत होता. हनुमानाच्या देवळात महाराज ज्ञानेश्वरी, अभंगगाथा यांसारखे ग्रंथ वाचत असत. कधी कधी अखंड पारायण करीत. अखंड पारायण म्हणजे काही दिवस खंड न पडता सतत वाचन करीत बसणे आणि ठरविलेला भाग पूर्ण झाल्यावर थांबणे. असे छोटे-छोटे उपक्रम महाराज हनुमानाच्या देवळात स्वतःच सुरू ठेवत.

हनुमानाच्या देवळात असताना महाराज रात्री अपरात्री केव्हाही देवळातून रानावनात भटकत. त्यांना कसलीही भीती वाटत नसे. प्रकृती चांगलीच धडधाकट होती. पिंड इतका गुटगुटीत होता की मारलेला दगडही परत टणकन पाठीमागे उडेल, असा! गोफणीतील दगड जसा भिरभिरत पुढे धावतो, तसेच महाराज तरुणपणात पळायला लागले की गोफणीतील दगडासारखेच सुटायचे.

कुणी त्यांना खुळसट म्हणायचे, तर कुणी वेगळ्याच दिमाखात निरखून पाहायचे. कुणी निंदा करो, कुणी वंदा करो—महाराजांना त्याचे काहीच वाटत नसे. अवतारी पुरुष असेच असतात; पण ही गोष्ट अज्ञानी लोकांच्या लक्षात येत नसे.

हनुमानाची पूजा महाराज पहाटेच करीत. पहाटे पूजा करायची म्हणजे त्यापूर्वीच पूजेच्या साहित्याची तयारी करणे आवश्यक असे. म्हणून महाराज रात्री दोनच्या सुमारास उठत. कडवी नदीत जाऊन स्नान करत आणि येताना वाटेतून पूजेचे साहित्य गोळा करून आणत. साप, विंचू, भूतखेत—या गोष्टींची त्यांना काहीच भीती नव्हती. जणू त्यांनी या साऱ्यांवर मात केली होती. भीती हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता.

कधी कधी देवळात जाणारी म्हातारी माणसे महाराजांना म्हणत,
“आरं बाळू, तुला भीती कशी वाटत नाही रे? रात्रीचा मुलुखभर फिरतोस, वाटेल तिथं झोपतोस!”

यावर हसत-हसत महाराज म्हणायचे,
“ज्यानं घरदार सोडलं आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला, त्याला या जगात परमेश्वराशिवाय कुणाचीच भीती नसते.”

हे मार्मिक उत्तर ऐकले की म्हातारी-कोतारी माणसे गप्प बसत; पण मनात मात्र म्हणत, कायतरी येडपट बोलतोय!

हनुमान हा साऱ्या सौतेगावाचा प्रिय देव. त्या प्रिय देवाच्या पायाशी महाराजांचा पिंड दररोज पडू लागला. हनुमानाच्या देवळात राहणारे ते तरणंताट पोरगं खरोखरच हनुमानासारखेच ताकदवान बनू लागले.