चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण २: विवाह ठरला पण महाराज पसार

प्रकरण २: विवाह ठरला पण महाराज पसार

"तरी झड झडोनी वहिला निघ" (ज्ञा.म.)

महाराजांचे लग्न वयाच्या बाराव्या वर्षी ठरले. कारण त्या काळात लग्न ही मुलामुलींना कळावयाच्या अगोदरच करण्याची प्रथा होती. काही वेळा तर पाळण्यालाही बाशिंग बांधले जात असे. समाजात रूढ असलेल्या चालीरीतीप्रमाणे महाराजांचेही लग्न ठरविण्यात आले.

रामदास निदान “शुभमंगल सावधान” ऐकून तरी बाहुल्यावरून पळून गेले; पण आमचे महाराज तर तेवढ्यापर्यंतही थांबू शकले नाहीत. लग्न ठरविल्याचे कळताच दुसऱ्याच दिवशी काखेत अभंगगाथेची चोपडी मारून ते सौते गावातून पळून पंढरपूरला गेले. तेथे त्यांनी सहा–सात वर्षे वास्तव्य केले. दिंडीरवनात एका भुयारात त्यांनी तपश्चर्या केली. त्या भुयाराची कथा अशी आहे—

तेथे एक राजा तपश्चर्या करून नुकताच निघून गेला होता. त्या मोकळ्या झालेल्या भुयारात महाराज तपश्चर्या करू लागले. दिवसभर ते गुहेत ध्यानस्थ बसत. सकाळी प्रातःविधी आटोपल्यावर माधुकरी (कोरडे अन्न) मागून आणत आणि त्यावर आपली उपजीविका करत. त्या भुयारात त्यांनी बसू नये म्हणून काही घटना घडल्या, त्या अशा—

एकदा तेथे एक विंचू आला. त्याचा नांगर मनगटासारखा मोठा होता. तो विंचू महाराजांच्या आजूबाजूला फिरू लागला. तो पाहून महाराज म्हणाले,
“देवा, तू माझी परीक्षा पाहतोस काय? मी मेलो तरी येथून निघून जाणार नाही.”

दुसरी घटना अशी की एके दिवशी त्या गुहेत भला मोठा नाग फुस्कार टाकत आला. महाराज जागचे हलले नाहीत. तो नाग काही वेळाने निघून गेला. तेव्हा महाराज म्हणाले,
“परत येऊ नकोस बाबा! मी इथेच राहणार आहे.”

तिसरी घटना अशी की अमावस्येच्या रात्री त्या भुयारावर बदाबदा दगडांचा वर्षाव झाला. महाराज त्या वेळी देवाच्या आराधनेत होते. ध्यानमग्नतेतून थोडेसे बाहेर येऊन महाराज म्हणाले,
“दगड कोसळू देत किंवा आकाश कोसळू दे; मी येथून हलणार नाही.”

सात वर्षांचा तपाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महाराज पंढरपूरातून अनेक ठिकाणी फिरले. सोलापूरच्या रस्त्यावर असलेल्या पुलाखाली काही दिवस राहिले. चंद्रभागेच्या वाळवंटात काही काळ काढला. डोळे भरून पंढरपूर पाहिले. विठ्ठलाला कडकडून मिठी मारून त्यांनी अनेकदा दर्शन घेतले.

“पतितपावन!” अशी हाक त्यांनी विठ्ठलाला असंख्य वेळा मारली. महाराजांनी आपल्या देहाचा गाभारा भक्तीने तृप्त केला. आपल्या हृदय रूपी मंदिरात विठ्ठलाची स्थापना करून, त्या मूर्तीवर नितांत श्रद्धेचा अभिषेक केला आणि महाराज तृप्त झाले.

सासरवाशिणीला माहेरी दीर्घकाळ राहिल्यावर जे सुख व समाधान मिळते, तेच सुख महाराजांना पंढरपूरच्या पावन नगरीत, पांडुरंगाच्या सान्निध्यात मिळाले.

लहान वयात महाराजांनी भुयारात वास्तव्य केले. देवाचा शोध घेतला. परमेश्वराची अखंड भक्ती करण्याचा निश्चय केला आणि परमात्म्याच्या सत्य स्वरूपाकडे ध्यान केंद्रित केले.