चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १८: जनकल्याणार्थ देह झिजविला

प्रकरण १८: जनकल्याणार्थ देह झिजविला

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ॥” (तु. म.)

गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवून आपले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बालदास महाराजांनी आयुष्यभर केले. सौते, शिरगांव, सावे, सावर्डे, मोळवडे, पेरीड, गाडयाचीवाडी, सागाव, कऱ्हाड, सातारा, पंढरपूर इत्यादी अनेक ठिकाणी महाराजांनी भ्रमंती केली आणि आपल्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याची ठसा उमटवला.

“संसार करावा नेटका,” असे सांगत संसारात राहूनही परमार्थ कसा साधता येतो, याचे मार्गदर्शन त्यांनी जन्मभर लोकांना केले. प्रत्येक गावात प्रमुख भक्ताच्या घरी किंवा चावडीवर जनसमुदाय जमवून प्रश्न–उत्तरांच्या माध्यमातून ते ज्ञानदान करत. अनेकदा विविध धर्मांचे व जातींचे लोक त्यांच्या समोर असत. अशा वेळी महाराज अत्यंत कौशल्याने सांगत की सर्वांचा देव एकच आहे. हिंदू, मुसलमान, शीख अशा कोणत्याही धर्मात परमेश्वर वेगळा नाही, ही भावना सर्वांच्या मनात दृढ करत. ते म्हणत, सर्व धर्मांचा एकच उपदेश आहे —
“अवघ्यावर प्रीत करावी.”
अशा प्रेमपूर्ण चर्चेनंतर महाराज सर्वांना आपुलकीने निरोप देत.

थोडक्यात सांगायचे तर महाराजांनी अनेक संस्कारकेंद्रे निर्माण केली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

कधी कधी महाराज लहान मुलांचा मेळावा जमवून त्यांना स्वच्छतेचे धडे देत. अंगण कसे झाडावे हे खराटा हातात घेऊन दाखवत, घर कसे स्वच्छ करावे हे केरसुणीने समजावून देत. घराभोवती गटारे उघडी नसावीत, राहत्या घरात जनावरे ठेवू नयेत, हे ते प्रभावीपणे पटवून देत.
“घरातील मोठ्यांना सांगा — जनावरे घराबाहेर छप्पर घालून बांधा,” असेही ते मुलांना सांगत.

महाराज मुलांना देवधर्माचे व सदाचाराचे संस्कार करणाऱ्या गोष्टी सांगत. जेवताना कसे बसावे, कसे खावे याचेही मार्गदर्शन करत.
“जगात एक मोठा देव आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. आपण त्याची भक्ती केली पाहिजे. खरे बोलले पाहिजे. खोटे बोलल्यास देव शिक्षा करतो,” असा उपदेश त्यांच्या बालमनावर खोलवर कोरला जाई.

“महार, मांग, चांभार असे जातींचे उल्लेख का करायचे?” असा प्रश्न महाराज अनेकदा उपस्थित करत.
“आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, मग जातीभेद का?” असे ते ठामपणे सांगत. महाराज कधीही हरिजनांना वेगळ्या कपात चहा देत नसत. भेदाभेद त्यांना अमंगळ वाटे. ते सर्वांशी समानतेने वागत.

सर्व समाजाला समान सुख मिळावे, कोणतीही व्यक्ती दुःखी राहू नये, अशी महाराजांची भूमिका होती. म्हणूनच ते म्हणत —
“कष्टाचे खा, फुकटाचे खाऊ नका. घाम गाळून काम करा, देव अन्न देईल. आपण चांगले वागा आणि दुसऱ्यांनाही तसे वागायला शिकवा. आपला देश गरीब आहे; काम केल्याशिवाय खाण्याचा अधिकार नाही. आश्रमात अपंग व्यक्तीही स्वावलंबनाने जगतात, मग सुदृढ असून आयते का खायचे?”

महाराजांचा उपदेश सर्वांसाठी असे.
“सारे विश्वचि माझे घर” ही भावना त्यांच्या प्रत्येक विचारात दिसून येत असे.

गावोगावी भिक्षा मागताना महाराज घरामागील परसाकडे पाहत.
“इथे केळी, नारळ, भाजीपाला, लिंबू, मिरची, आंबा लावा. परसातून चांगले उत्पन्न मिळू शकते. जपानमध्ये इंचन्‌इंच जमीन लागवडीसाठी वापरतात, आणि आपण जमीन मोकळी ठेवतो,” असा उपदेश करत. याचा परिणाम म्हणून अनेक घरांचे परस हिरवळीने नटले.

घर नसलेल्या गरीबांसाठी महाराज श्रीमंतांना एकत्र बोलावून म्हणत,
“अरे श्रीमंतांनो, गरीबांची काळजी कोण घेणार? चला, या गरिबांना साधी कौलारू घरे बांधा. तुम्ही वाड्यात राहता, तुपरोटी खाता; गावातील गरिबांचा विचार तुम्ही नाही केला तर कोण करणार?”
या शब्दांनी लाजून श्रीमंत लोक मदतीला पुढे येत आणि गरिबांना निवारा मिळे.

कधी महाराज शाळा व हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षकांना म्हणत,
“तुम्ही मुलांना शिकवता, पण गावातील मोठी माणसे अडाणी आहेत. त्यांनाही मोकळ्या वेळेत शिकवले पाहिजे.”
या प्रेरणेने शिक्षक कार्याला लागत.

अशा रीतीने महाराजांना संपूर्ण समाजाची चिंता होती. सगळे सुखी व्हावेत, शिकलेले व्हावेत, सर्वांना चांगले दिवस यावेत, हीच त्यांची ध्यासवृत्ती होती. संपूर्ण देह त्यांनी जनकल्याणासाठी झिजविला.

“मना चंदनाचे परी त्वा झिजावे,
परी अंतरी सज्जना निववावे॥”

या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे बालदास महाराज आयुष्यभर झिजले. केवळ स्वतःच्या मोक्षासाठी नव्हे, तर लोकांच्या आत्म्यातील परमात्म्यासाठी. त्यांनी माणसाच्या आत्म्यात वसणाऱ्या परमेश्वरावर प्रेम केले आणि सामान्य जनाला सांगितले —
परमेश्वर म्हणजेच तुमचा–आमचा आत्मा.
“अहं ब्रह्मास्मि” ही भावना प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

प. पू. स्वरूपानंद महाराज (पावस) म्हणतात —

आणिकांचे सुख देखोनि जो सुखी ।
होय धन्य लोकी तोची संत ॥
आणिकांचे दुःख देखानिया डोळा ।
येई कळवळा तेचि संत ॥
आणिकांचे दोष आणिना मनी ।
गुणाते वाखाणी तोचि संत ॥
लोककल्याणार्थ वेंचि जो जीवित ।
संत तो महंत स्वामी म्हणे ॥

बालदास महाराजांना खऱ्या अर्थाने समाजसेवक संत अपेक्षित होते. आयते खाणारे संत ते
“खादीला कार आणि धरणीला भार” म्हणत. देवप्राप्तीबरोबरच समाजसेवा ही संतांची जबाबदारी आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

नोव्हेंबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा महाराज गप्प बसले नाहीत. गावोगावी फिरून मदतीचे आवाहन केले, सेठ-सावकारांना देशासाठी आर्थिक मदत करण्यास प्रवृत्त केले. पाकिस्तान आक्रमणाच्या वेळीही त्यांनी हीच भूमिका निभावली.

भूकंप, पूर, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडलेल्या लोकांसाठी महाराज स्वतः मदत गोळा करत, कधी स्वतःची साधनेही देत.
“ज्यांच्याकडे काहीच उरलेले नाही, त्यांना आपण मदत नाही केली तर कोण करणार?” असे ते भावुकपणे सांगत.

लोकसंख्या वाढीबाबतही महाराज जागरूक होते.
“लोकसंख्या मर्यादित ठेवणे हे देशहिताचे आहे,” असे ते स्पष्टपणे सांगत.

दारू, जुगार, मटका यांत गुंतलेले लोकही कधी त्यांच्या दर्शनाला येत. महाराज त्यांना कठोर पण प्रेमळ शब्दांत समज देत आणि म्हणत,
“बायका-पोरांसाठी तरी काही साठवून जा.”

राष्ट्रासाठी झिजणारा हा खरा राष्ट्रीय संत होता. वैयक्तिक सुख-दुःखापलीकडे जाऊन संपूर्ण राष्ट्राच्या वेदना आपल्याशा करणारा, प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कर्तव्याशी निष्ठावान असलेला हा एक महान संत होता.