चरित्र
प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.
प्रकरण १७: स्वभाव
सहज बोलणे हितउपदेश । (तु. म.)
महाराज लहानपणी दिसायला फारच गोंडस होते. त्यांची मूर्ती काळीसावळी व गोजिरीवाणी होती. अंगकाठी धडधाकट, कपाळ भव्य, आणि शरीर तेजस्वी दिसत असे. अंगावरचे काळेभोर, बारीक केस त्यांच्या उघड्या शरीरावर अप्रतिम शोभून दिसत.
वय आणि ज्ञान वाढत गेले तसे महाराजांकडे भक्तगण जमा होऊ लागले. त्यांना भक्तांचा मेळावा आवडू लागला. महाराजांची देहयष्टी जशी भव्य होती, तसेच त्यांचे मनही विशाल होते. सागर जसा सर्व काही आपल्या पोटात सामावून घेतो, तसे महाराज वाटत. चांगल्या-वाईट अनुभवांतून गेले तरी त्यांनी कधीही वाईटांना तुच्छ लेखून दूर लोटले नाही. दुर्जनांनाही ते उपदेश करत आणि चांगले वागण्याचे शिक्षण देत.
जमीनीवर लोळणाऱ्या जटा, सुमारे सहा फूट उंची, म्हशीच्या पोकडीसारखी दाढी आणि रुंद छाती असलेले महाराज बोलू लागले की ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन गप्प बसत असे. जणू एखाद्या प्रचंड फौजदारासमोर शिपाई उभा राहावा, तसे भक्तगण त्यांच्या समोर उभे राहत. महाराजांच्या पुढे बोलण्याचे कोणाचेही धाडस नसे. महाराज जे सांगतील ते भक्त निमूटपणे ऐकत.
एकदा एक मुलगी महाराजांकडे आली व म्हणाली,
“महाराज, मी फार मोठी चूक केली आहे. ती उणीव मी आयुष्यभर भरून काढू शकणार नाही. मला फार पश्चात्ताप होतो आहे. आता मी काय करू?”
महाराज शांतपणे म्हणाले,
“झाली चूक, होऊ दे. जे झाले ते विसर. तुझा पश्चात्ताप हीच तुझी मोठी शिक्षा आहे. यापेक्षा दुसरी शिक्षा नको. मात्र पुढे पुन्हा अशी चूक करू नकोस.”
महाराजांनी घाबरलेल्या मुलीला असा धीर दिला.
एकदा एक हरिजन गृहस्थ महाराजांकडे आला. महाराजांची कीर्ती ऐकून तो प्रथमच मठात आला होता. महाराजांनी त्याला प्रेमाने जेवायला बसवले. तो पत्रावळीवर जेवला. जेवणानंतर महाराजांनी त्याला आपल्या पेल्यातून पाणी पिण्यास दिले. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला,
“मला पाणी वरून वाढा.”
महाराज म्हणाले,
“तू आणि मी यात भेद मानू नकोस. देवाने कधीच भेदभाव शिकवलेला नाही. हा भेद माणसाने निर्माण केला आहे.”
यानंतर अधिक न बोलता तो गृहस्थ महाराजांच्या पेल्यातून पाणी प्याला. महाराज हसत म्हणाले, “खुळा रे खुळा!”
एकदा एक भक्त कोर्टाच्या कामासाठी निघाला होता. वाटेत त्याला पाण्याची घागर आडवी दिसली. हा शुभशकून समजून त्याने मठात येऊन महाराजांना सांगितले. महाराज म्हणाले,
“तुझे काम होण्याचा योग आहे.”
एकदा एका भक्ताचे आपल्या भावाशी भांडण झाले. भावाने त्याला काठीने जोरात मारले. मारणाऱ्या व्यक्तीला महाराजांनी मठात बोलावले. प्रश्न विचारण्यापूर्वीच तो म्हणाला,
“माझी चूक झाली आहे, मला माफ करा,”
आणि थरथरत उभा राहिला. महाराजांची नजर पडताच तो हुंदके देत रडू लागला. महाराजांनी त्याला खाली बसवून बंधुप्रेम समजावून सांगितले.
एक भक्त संध्याकाळी महाराजांचे अंथरूण घालण्यासाठी मठात गेला. महाराज म्हणाले,
“माझे हात-पाय धड आहेत. तोपर्यंत दुसऱ्यांनी माझी सेवा कशाला करावी?”
एकदा एका भक्ताने काटवेलीची भाजी आणली. त्या भाजीत मीठ नव्हते. महाराज म्हणाले,
“मीठ असो वा नसो, आम्हाला सारखेच.”
एक सेठसावकार चार धोतरं व चार दंडक्या घेऊन आला. महाराज म्हणाले,
“मला एवढे कपडे लागत नाहीत. दोन धोतरं आणि दोन दंडक्या पुरेशा आहेत. त्यावरच माझे वर्ष निघते.”
यातून महाराजांची मितव्ययी वृत्ती स्पष्ट दिसते.
एकदा मुंबईहून आलेल्या भक्ताने विचारले,
“महाराज, तुम्ही किती तास झोपता?”
महाराज म्हणाले,
“अनेक वर्षे झाली, दोन तासांपेक्षा जास्त मी कधी झोपलो नाही.”
महाराजांना झोपेचे विशेष आकर्षण नव्हते.
महाराज नेहमी गुरुंच्या मूर्तीच्या सान्निध्यात बसत आणि तिथेच झोपत. गुरुचरणांवरील त्यांचे प्रेम अतूट होते.
तरुणपणी महाराजांचा परिसर घनदाट झाडीने वेढलेला होता. मठाजवळ जंगल होते, जिथे अनेक जंगली प्राणी राहत. तरीही महाराज कोणत्याही वेळी निर्भयपणे त्या जंगलातून जात-येत.
महाराज शिजवलेला किंवा कच्चा झाडपाला खातानाही आधी गुरुंना नैवेद्य दाखवत. गुरुची पूजा करताना असे वाटे की जणू गुरु स्वतः त्यांच्याशी बोलत आहेत.
महाराजांच्या स्वभावात दंभ व अभिमान नव्हता; मात्र क्षमा, नम्रता व अहिंसा हे सद्गुण ठासून भरलेले होते.
महाराजांना पाया पडून घेणे आवडत नसे. लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन ते लांबून दर्शन देत. काही वेळा ते म्हणत,
“देवाच्या पाया पडा. जो जगाचा पालनकर्ता आहे त्याला शरण जा. माझ्या पाया पडून तुम्हाला काय लाभ?”
तेव्हा भक्त म्हणत,
“आम्हाला आपल्यात देव दिसतो. आपण ज्ञानाचे सागर आहात म्हणून आम्ही नतमस्तक होतो.”
महाराजांना सर्वत्र मोठा मान होता. त्यांचे भक्त खेड्यांपासून शहरांपर्यंत पसरलेले होते. तरीही त्यांना कधीही गर्व झाला नाही.
तात्पर्य:
महाराज सात्त्विक स्वभावाचे, ज्ञानी, धैर्यशील व करुणामय होते. दया, क्षमा आणि शांती यांचे ते सजीव प्रतीक होते.