चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १६: मोठ्या मठाचा त्याग

प्रकरण १६: मोठ्या मठाचा त्याग

“भोग भोगावरी द्यावा । संचिताता करुनी ठेवा ॥” (तु. म.)

एके दिवशी अचानक बालदास महाराजांनी सौते मठाचा त्याग केला. महाराज सावर्डे येथे जाऊन गणपती पाटील यांच्या साध्या छपरात राहू लागले. तेथे त्यांची सेवा करणारे अनेक भक्त हळूहळू गोळा होऊ लागले. बजागवाडी, कोपर्डे, सौते, शिरगांव, कोकरुड, सावे, सावर्डे, सांबू मोळवडे इत्यादी गावांतील भक्त महाराजांच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ लागले. महाराजांच्या सेवेसाठी हे भक्त रात्रंदिवस तत्पर असत.

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून एखादा भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आला, तर तो थेट गणपती पाटलांच्या त्या छपराकडेच जाई. कारण महाराजांचा—त्यांचा देव—तेथे वास्तव्यास होता. ज्याच्या भेटीची आतुरता आहे, तो भक्त तिथेच जाणार नाही तर कुठे जाणार?

महाराज साध्या पाल्याच्या छपराखाली राहत होते. त्या छपराला कामट्याचे तात्पुरते दार होते. अशा अत्यंत साध्या जागेत प्रत्यक्ष परमेश्वरच जणू वास करीत होता. याच छपरात महाराज झाडपाला शिजवीत आणि घोंगडीवर विसावून राहत. पाचोळ्याच्या छपराखाली त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाने, पण तेजस्वी तपश्चर्येत चालू होते.

गणपती पाटलांच्या सावर्डे गावच्या रानातील या छपरात वास्तव्यास असतानाच महाराज कधी कधी सौते मठात येत. मठात झाडलोट करून स्वच्छता करत आणि आपल्या सद्गुरूंच्या मूर्तीला भक्तिभावाने कवटाळून मिठी मारत. अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ते गुरुमूर्तीची पूजा बांधत. कधी कधी एखादा दिवस तेथेच थांबतही असत; परंतु असे प्रसंग फारच विरळ होते.

या छपरात महाराज सलग तीन वर्षे राहिले. त्यानंतर महाराज शिरगांव येथे रामचंद्र पाटील यांच्या घराच्या पडवीला बांधलेल्या खोलीत काही काळ वास्तव्यास गेले. त्याच ठिकाणी अखेर महाराजांनी आपला देह ठेवला.