चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १३: सौते मठाचे काम पूर्ण

प्रकरण १३: सौते मठाचे काम पूर्ण

“सत्यसंकल्पाचा दाता नारायण | सर्व करी पूर्ण मनोरथ ||” (तु. म.)

सौते मठाचे बांधकाम काही काळासाठी बंद पडले होते. बांधकाम सुरू असताना असो वा ते थांबलेले असताना असो—बालदास महाराज गुरूंच्या इच्छेनुसार विविध तीर्थक्षेत्रांना जात असत. त्यामुळे मठाचा पसारा तसाच पडून राहिला होता. बांधकामाचा पुढाकार घेणारे सत्पुरुष जर तेथे उपस्थित नसतील, तर तो भार उचलणार तरी कोण?

अखेर बालदास महाराजांनी रात्रंदिवस परिश्रम करून सौते मठाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन अपुरे बांधकाम पूर्ण करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. स्वतः पाट्या भरून वाळू-सिमेंट वाहून दिले. भिंती उभारण्यासाठी दगड उचलून गवंड्यांना बांधकामात प्रत्यक्ष मदत केली. महाराज कामाला लागले की दहा माणसांचे काम ते एकटेच झपाट्याने करून दाखवत असत.

रात्री काम करताना महाराज बत्तीचा, तर प्रसंगी दिवटीचाही उपयोग करत. मठाचे काम नीट आणि दर्जेदार व्हावे यासाठी ते गवंड्यांना नेहमी समजावत असत. ते म्हणत,

“अरे, हे देवाचं काम आहे. यात फक्त खायचा विचार करू नकोस. आळस करून वेळ काढू नकोस. जे करायचं आहे ते नीतीनं आणि प्रामाणिकपणानं कर. तू जर हे देवाचं मंदिर चांगलं बांधलंस, तर या जगात तुझं कोणीही वाईट करणार नाही. आपण कोणताही धंदा करत असलो, तरी त्या धंद्यात प्रामाणिकपणा हवाच.”

सद्गुरु बालदास महाराजांचे हे बोल ऐकून गवंडी नम्रपणे म्हणत असत,
“हो महाराज, कुठं कसं वागावं आणि कुठं कसं दिवस बेरजेवर काढावं, हे आम्हाला कुठं कळतं हो. तुम्ही एवढा जीवाचा आटापिटा कशासाठी करता, हेच आम्हाला उमगत नाही.”

त्यावर महाराज हसत उत्तर देत,
“अरे, माणसाला या जगात सगळं कळत असतं, पण वळत नाही—हा खरा प्रश्न आहे. यावर उपाय काय? तूच सांग. लबाड बोलू नये हे सगळ्यांना पटतं, पण खरं किती लोक बोलतात? राग मानू नकोस. आपल्यासमोर आदर्श ठेवून कामाला सपाटा लाव.”

अशा प्रेमळ, तरीही टोचणाऱ्या शब्दांनी गवंडी नव्या जोमाने कामाला लागत असत. महाराजही हसतमुखाने लागेल ती मदत गवंड्यांना करत राहात.

अतोनात परिश्रम घेऊन बालदास महाराजांनी सौते गावचा मठ उभारला. गावकऱ्यांनीही त्यांना भरपूर सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून अखेर सौते गावचा मठ साकार झाला. हा मठ इ. स. १९५० साली पूर्ण झाला.

मठ पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सर्व लोकांना अत्यंत आनंद झाला. तो मठ संपूर्ण गावाचे व आसपासच्या परिसराचे तीर्थक्षेत्र बनला. त्या मठातच आपले सद्गुरु प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांचा फोटो व पादुका बालदास महाराजांनी पूजेसाठी स्थापित केल्या. भजन, पूजन, वाचन आदी धार्मिक विधींनी मठाचा गाभारा निनादू लागला. अध्यात्मज्ञानाच्या चर्चा तेथे घडू लागल्या आणि बालदास महाराजांच्या सान्निध्यातील भक्तांना स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळू लागला.