चरित्र
प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.
प्रकरण १०: सद्गुरुंची मेवा
"आघवियांची दैवा | जन्मभूमी दे मेवा" (ज्ञा. म.)
हिंदुस्थानची पदयात्रा पूर्ण करून आल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावच्या मठात तपश्चर्या करीत थांबले. त्यांची प्रकृती आता थोडी थकू लागली होती. तरीसुद्धा योगासने करणे, समाधी लावणे व उतरविणे इत्यादी योगीपुरुषाला आवश्यक असलेली कर्मे नित्यनियमाने सुरूच होती.
एके दिवशी सद्गुरुंनी बालदास महाराजांना जवळ बोलावून सांगितले,
“थोड्याच दिवसांचा मी तुझा सोबती आहे. मला माझ्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पुढे वाटचाल करणे भाग आहे.”
हे ऐकताच बालदास महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले. वळवाचा पाऊस जसा अचानक कोसळतो, तसेच बालदास महाराज घळाघळा रडू लागले. आपल्या सद्गुरुंनी आपल्याला सोडून जावे, असे कोणत्या शिष्याला वाटेल? बालदास महाराज क्षणभर कावरेबावरे झाले. त्यांना काहीच सुचेना. मग भरलेल्या अंतःकरणाने ते सद्गुरुंना म्हणाले,
“महाराज, आपण माझ्या गावी चला आणि तेथेच आपला पवित्र देह ठेवा. महाराज, हीच माझी शेवटची इच्छा आपल्या चरणी आहे. आपण ती पूर्ण करावी.”
त्यावर चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकावत सद्गुरु म्हणाले,
“अरे, असे का बोलतोस? तू आणि मी दोन आहोत काय? तू म्हणजेच मी आहेस आणि मी म्हणजेच तू आहेस.”
यानंतर बालदास महाराज सद्गुरुंच्या जवळच कायम बसून राहू लागले. एक क्षणही वाया न घालवता त्यांनी गुरुसेवेला स्वतःला वाहून घेतले. गुरुंच्या चरणांवर हात फिरवणे, छातीला कान लावून हृदयाचे ठोके ऐकणे—हीच त्यांची सेवा बनली.
कधी कधी सद्गुरु आपल्या सुखस्वप्नांची गोष्ट सांगत. मध्येच थांबून कर्तव्याची जाणीव करून देत. हे ऐकताना बालदास महाराज समाधानी होत, तरीही आपला देव, आपला गुरु, आपले सर्वस्व आपल्या सान्निध्यातून दूर जाणार—ही भावना त्यांना विसरता येत नव्हती. गुरुंच्या गमनाची क्षणभर आठवण झाली, तरी बालदास महाराजांच्या डोळ्यांत गहिवर येई. गुरुंची नजर त्यांच्या नजरेला भिडली की ते आपले अश्रू आवरून डोळे मिटत. त्या नेत्रमंदिरात पुन्हा गुरुंची मूर्ती अधिष्ठित होत असे.
बालदास महाराजांच्या अंतरीचे दुःख ओळखून सद्गुरु म्हणाले,
“बाळू, हा मानवदेह फार मौल्यवान आहे. या जन्माची खरी किंमत फार थोड्या लोकांना कळते. ज्याचा देह विधात्याच्या कसोटीवर उतरतो, तो धन्य होतो. बाळू, हे जाणून घे. तुझ्यातच मी सामावलो आहे, असे सांगूनही तू दुःखी का दिसतोस?”
हे ऐकल्यावर बालदास महाराज शांत झाले. थोडा वेळ गेल्यावर त्यांनी विचारले,
“महाराज, आपल्या पश्चात मी काय करावे?”
सद्गुरु म्हणाले,
“बाळू, तुझी इच्छा असेल तर माझी आठवण म्हणून तू माझी समाधी बांध.”
हे गुरुंचे अखेरचे भाव जाणून बालदास महाराज म्हणाले,
“सद्गुरु, मी आपणाला वचन देतो की आपली समाधी बांधून आपली इच्छा पूर्ण करीन आणि परमेश्वराच्या नामस्मरणाचा मंत्र सामान्य माणसांपर्यंत पोहोचवीन.”
हे वचन ऐकून गुरुंच्या श्रुती धन्य झाल्या.
इ.स. १९४७ साली कार्तिक वद्य एकादशी, सोमवार या दिवशी सद्गुरु नेर्लेकर महाराज समाधिस्थ झाले. पद्मासनात समाधिस्थ झालेली ती सगुण मूर्ती पाहण्यासाठी नेर्ले गाव व आजूबाजूचा परिसर लोटला होता. स्त्री-पुरुषांनी डोळे भरून त्या मूर्तीचे दर्शन घेतले. सर्वांचे नेत्र कृतार्थ झाले.
त्याच वेळी बालदास महाराज त्या मूर्तीला कवटाळून उभे होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. त्या अश्रुगंगेतून गुरुंच्या मस्तकावर अभिषेक होत होता. गुरुंचे सारे अंग जणू न्हाऊन निघाले होते.
गुरुला दिलेले वचन बालदास महाराजांनी तत्क्षणी पूर्ण केले. बांधलेल्या समाधीभोवती धूप दरवळू लागला. दीपांच्या सोनेरी प्रकाशात समाधी उजळून निघाली. चंदनाच्या सड्यांनी समाधी तृप्त झाली. समाधीभोवतालची पाच-दहा फूट जागा चंदनाच्या सुगंधाने न्हाऊन निघाली. समाधीवर चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आणि त्या पादुकांसमोर बालदास महाराज आपल्या नयनांतील प्रेमाश्रू ढाळीत शांतपणे बसले.