योगीराज प.पू. बालदास महाराज समाधी मठ शिरगांव या ठिकाणी प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट या विश्वस्त संस्थेची स्थापना झाली आहे. महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. मुंबई या ठिकाणी असणाऱ्या भक्तांनी एकत्र येऊन प.पू. बालदास महाराज सेवा संघ (मुंबई) या संस्थेची स्थापना केली आहे. सदर संस्थेच्या माध्यमातून योगीराज महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जाते.
दरवर्षी कार्तिक वद्य १२ या तिथीला म्हणजेच उत्पती एकादशी नंतर द्वादशीला योगीराज महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हरीनाम सप्ताहास सुरुवात होते. सात दिवस ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, हरीपाठ, किर्तन व त्यानंतर जागर असा दैनंदिन कार्यक्रम असतो. हजारो भक्त दर्शन, श्रवण व प्रसादाचा लाभ घेत असतात. आठव्या दिवशी काल्याचे किर्तन व महाप्रसाद होऊन दुपारी कुस्त्यांचे जंगी सामने झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते. मुंबई, सातारा, पुणे, कराड, कोल्हापूर इ. महाराष्ट्राच्या सर्व भागांतून तसेच पंचक्रोशितील भक्त हजारोंच्या संख्येने येऊन महाप्रसाद व समाधी दर्शनाचा लाभ घेत असतात. अनेक नामांकित किर्तनकारांची किर्तने व प्रवचनकारांची प्रवचने सप्ताह काळात होत असतात.
योगीराज प.पू. बालदास महाराज यांचे समाधीवर व विठ्ठल-रखूमाई मंदिरावर सुंदर शिखरांनी युक्त दोन इमारती आहेत.
वारणा एज्युकेशन सोसायटी-सागाव या संस्थेद्वारे या ठिकाणी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज सुरु आहे. सदरच्या हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजसाठी प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट या संस्थेने इमारत बांधून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. हरीनाम सप्ताहात शिक्षक व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असतो.
योगीराज प.पू. बालदास महाराज यांनी गंडा, दोरा, अंगरा, धुपारा इ. समाजास अंधश्रद्धेकडे घेऊन जाणाऱ्या साधनांचा वापर केला नव्हता. किंबहूना त्यास त्यांचा सक्त विरोधच होता. आज सुद्धा येणारे सर्व भक्त श्रद्धेने येत असतात. समाजास सुसंस्कारीत बनविण्यासाठी आतासुद्धा विश्वस्त संस्थेमार्फत अनेक उपक्रम घेतले जात आहेत.
|| जय योगीराज ||