एकदा माझे वडिल आणि महाराज हे दोघे सौते मठातून चालत बांबवडेपर्यंत आले. बांबडयातून ते एका मालवाहतुक ट्रकातून कोल्हापूरात पंचगंगा नदीवर उतरले. पंचगंगा नदीच्या घाटावर महाराजांनी थोडावेळ जप व कुठल्यातरी ग्रंथाचे वाचन केले.
नंतर दोघेजण चालत चालत कुंभार गल्लीच्या दत्तमंदिराकडे आले. येताना माझ्या वडिलांना महाराज म्हणाले, “दत्तोबा, आपण हार घेतला नाही आणि पेढेही घेतले नाहीत. निदान दत्ताला तेथल्या औदुंबराला वाहाण्यासाठी चारफुले तरी घ्यायला हवी होती.” माझें वडिल म्हणाले, मी जाऊन आंबाबाईच्या देवालयाजवळून आणू काय ? लगेच जाऊन येतो.”
“नको. देवाला बेल, पान, पाणी, पेढे हार, नारळ, उदबत्ती कशाचीही अपेक्षा नसते. त्याला फक्त शुद्ध भक्तीची गरज असते. ती आपणाकडे आहे. मग मनातला विचार काढून टाकूया.” महाराज कुंभारगल्लीच्या दत्ताच्या मंदिरात औदुंबराच्या झाडाकडे बघत बघत आत पाऊल टाकणार येवढयात एक शर्ट विजार घातलेला, बोडका, टक्कल पडलेला एक चाळीस पंचेचाळीस वयाचा माणूस महाराजांना हाक देऊ लागला-
“आहो, महाराज थांबा, थांबा. मी हे आणलंय ते घ्या आणि पुढं जावा.”
महाराज एक पाय हुंबऱ्याच्या आत आणि एक पाय हुंबऱ्याच्या बाहेर अशा अवस्थेत थांबले, त्यामाणसाने महाराजांना एक भरलेली पिशवी आणून दिली. त्यात नारळ, पेढे, फुले हार, उदबत्ती, कापूर खडीसाखर हे सगळे होते. नंतर तो माणूस पटकन तेथून निघून गेला.
महाराजांनी ते सर्व औदुंबराच्या झाडाला वाहिले आणि मस्तक टेकून औदुंबराचा आशीर्वाद घेतला. हुंबऱ्यातून बाहेर आल्यावर वडिलांनी महाराजांना विचारले,
“महाराज ही पिशवी देऊन गेलेला माणूस कोण?”
महाराज म्हणाले, “दत्तोबा, ते त्या माणसालाच विचार.”
माझ्या वडिलांनी मनात काय ओळखायचे ते ओळखले आणि गप्प राहिले.
Leave a Reply