एकदा शंकर कैकाडी महाराजांना भेटण्यासाठी आला. त्याचा बुटटया, टोपली, सूपे, दुरडया, तट्टे वळण्याचा धंदा होता. तो सौते गावात बुट्टया विकण्यास आला होता.
त्यानं महाराजांच्या मठात येऊन दर्शन घेतलं आणिम्हणाला, “महाराज माझ्याकडं आपणाला देण्यासारखं काही नाही. आपल्या चरणाजवळ मी काहीही ठेऊ शकत नाही.”
त्यावर महाराज म्हणाले, “तुझ्याकडुन मला कशाचीही अपेक्षा नाही. तू मला प्रेमानं आणि भक्तीने भेटलास हेच मोलाचं.”
कैकाडी म्हणाला, “मी आपणाला एक वळलेली चिव्याच्या कामटयाची बुट्टी देऊ काय? आपणाला राग येणार नाही न्हवं ? मला तर जबर इच्छा आपणाला बुट्टी अर्पण करण्याची आहे. यावर हसत हसत महाराज म्हणाले, “अरे बाबा ! तुझ्या इच्छेनुसार तू कर”
हे संभाषण ऐकून मध्येच एक भक्त म्हणाला, “महाराज बुट्टीचा तुम्हाला काय उपयोग? महाराज त्या भक्ताला म्हणाले त्या बुट्टीचा काय उपयोग ते तू आठ – दहा दिवसांनं बघ.
आठ – दहा दिवसानं त्या भक्ताने न चुकता महाराजांना विचारले,“काय त्या बुट्टीचा आपण उपयोग केलात महाराज ?”
महाराजांनी त्या बुट्टीत माती घालून त्यात मेथीचे बी टाकले होते. त्या बुट्टीत मेथीची भाजी डुलायला लागली होती. हे दृश्य बघताच तो भक्त गप्पच झाला. महाराज त्याला म्हणाले,
“माणसाला देवानं डोकं दिलंया ते उपयोग करण्यासाठी. ती बुट्टी मठात तुला टाकाऊ वाटली होती न्हव ? त्या बुट्टीतील मेथीची भाजी तुझ्याकडं बघून हसायला लागलीय बघ!
Leave a Reply