पत्रावळयांच्या गठ्यांचे कोडे सुटता सुटना

काही वेळा जनावरे चारताना महाराज पळसांच्या पानांच्या पत्रावळया तयार करीत. बरोबर असलेल्या इतर गुरख्यांनाही ते पत्रावळया तयार करायला शिकवत. तयार झालेल्या पत्रावळयांचे ते बांधण्याने गठ्ठे बांधत. संध्याकाळी घरी येताना प्रत्येकजण एक एक गठ्ठा डोक्यावर घेऊन येत.

घरात आणलेला गठ्ठा प्रत्येकजण गठ्ठुयावर गठ्ठा असे रचून ठेवत. एके दिवशी महाराजांनी सगळया गुराख्यांना विचारले, “पत्रावळयाने किती गठ्ठे झालेत.”

“पन्नास गठ्ठे झालेत.”

“आज घरी गेल्यावर सरळ मोजा आणि मला उदयाला सांगा. घरी गेल्यावर गठ्ठे दोन-तीन वेळा मोजा मोजताना चुकू नका बर का?”

“आहो महाराज गठ्ठे मोजलेत परत काय मोजायचेत. आमचे सर्वांचे सारखेच म्हणजेच पन्नास गठ्ठे झालेत.”

“अरे बाबांनो ! परत आज मोजा. मोजायला काय पैसे पडतात काय ? मी सांगतोय म्हणून आज आणखीन मोजा. उद्यालाही मला पन्नास गठ्ठे आहेत तसेच द्या म्हणजे झालं. जास्त काय तुम्हाला सांगू

सगळे गुराखी घरी आले. आपल्या आपल्या घरातील पत्रावळयांचे गठ्ठे मोजायला लागले. प्रत्येकाच्या घरी पन्नास ऐवजी सत्तर गठ्ठे पत्रावळयांचे होते. प्रत्येक गुराख्याने दोनतीन वेळा मोजले. तर उत्तर एकच होते की पत्रावळयांच्या गठयांची संख्या होती सत्तर.

दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व गुराखी महाराजांच्याकडे मठात गेले. महाराज सर्व गुराख्यानां बघताच म्हणाले,

“अरे बाबांनो! तुमचे पत्रावळयांचे गठ्ठे पन्नासच आहेत न? पन्नास गठ्ठे आहेत हेच मला तुमचे सगळयांचे उत्तर पाहिजे आहे.”

“नाही महाराज गठ्यांची संख्या सत्तर आहे.”

“ती कशी?”

“होय, महाराज गठ्ठे सत्तर आहेत हा काय चमत्कार? हे कोडे काय ते आम्हाला सुटेना.”

“खुळ्यांनो, हे पत्रावळयांचे गठ्ठे सत्तर कसे झालेत ते तुम्हीच देवाला विचारा. देव त्याचे उत्तर देईल मी काय सांगणार?”

महाराजांनी सगळयांच्या हातावर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला मिटक्या मारत खडीसाखरेचा प्रसाद खात खात सगळेजण घरी गेले.

Leave a Reply

Your email address will not be published.