एक भक्त महाराजांना म्हणाला, “महाराज मला सगळे लोक नावे ठेवतात. कारण माझ्या बोलण्यात कायम मी हा शब्द असतो.” महाराज म्हणाले, “म्हणजे तुला नेमके काय म्हणायचे आहे?” भक्त म्हणाला, “महाराज मी प्रत्येक गोष्टीची माहिती देताना मी हा शब्द वापरतो. उदा. मी हे घर बांधले. मी ही गाडी घेतली. मी सगळा पैसा उभा केला. मी हे केले, मी ते केले – असे सगळे मी मी मी हे माझ्या बोलण्यात येते त्यामुळे सगळे म्हणतात जगातल्याही सगळया गोष्टी ह्यानेच केल्या आहेत. याने दुसऱ्याला काय करायचे ठेवले नाही.” महाराज शांतपणे म्हणाले,” ऐक बाबा, तू घर एकटयाने बांधलेस का घरातील सगळयांच्या मदतीने बांधलेस? घराला पैसा सगळयांचा घातलास का तुझ्या एकटयाचा घातलास? घर जर सगळ्यांनी बांधले असेल, त्या साठी पैसा जर सगळयांनी घातला असेल तर तू “मी” शब्द का वापरतोस? ती तुझी मोठी चूक आहे. नेहमी हे आम्ही केले, आम्ही सर्वांनी केले किंवा हे देवाने केले – देवाच्या कृपेने झाले असे म्हणालास तर ते श्रेय सर्वांना मिळेल. “मी” या शब्दाची तुझी चेष्टा होणार नाही. हा तुझ्या बोलण्यात बदल कर तू मीपणा सोडलास तर सर्वांचा तुला चांगुलपणा मिळेल. मी या शब्दात मीपणा म्हणजे उर्मटपणा आहे तर आम्ही या शब्दात चांगुलपणा भरला आहे.
Leave a Reply