महाराज बांदयांच्या जंगलात जनावरं घेऊन चारायला जात. जनावरं चरत असताना महाराज ग्रंथ वाचनाचे आणि पाठांतराचे काम करीत असत. काहीवेळा विरंगुळा म्हणून ते करवंदाच्या जाळीजवळ जाऊन करवंदे तोडत व पळसाच्या पानांचा द्रोण करुन त्यात साठवत. द्रोण भरला की तो द्रोण ते पळसाच्या पानांनी तयार केलेल्या इस्तारीवर ओतत व परत दुसऱ्यांदा – तिसऱ्यांदा असा द्रोण भरुन आणण्यास जात. इस्तारीवर असाच एकदा मोठा ढिग साचला. संध्याकाळी घरी परतताना त्यांनी तो ढीग सर्व गुराखी मित्रांना वाटला. त्यांना महाराज म्हणाले,
“ही करवंदे घरी घेऊन जावा मीठ लावून खावा. पण खाता खाता एक काम करा.”
एक गुराखी म्हणाला, “कोणतं काम करु?”
“खाताना प्रत्येक करवंद पारखून खायचं, आणि पारखताना ते इतरांच्यापेक्षा वेगळं वाटलं तर मग ते करवंद मला दाखवायला आणायचं.”
“एकही करवंद वेगळं वाटलं नाही तर सगळीच करवंद खायची काय?”
“होय. खाल्लीतर चालतील.”
“तुम्हाला नको झाली तर घरातील इतरांना वाटलीसा तरी चालेल.”
“बंर तर, तुम्ही दिलेली करवंदे महाराज आम्ही पारखून पारखून खातो.”
“बंर तर चला आता. अंधारायला लागलंय, कडूस पडलं तर दिसत नाही. जनांवरंही
चालताना जास्त ठेसकळतात,”
सर्व गुराखी जनावरे घेऊन घरी आले हातपाय धुऊन जेवायला बसले जेवताना मीठाबरोबर कच्ची करवंदे खायला घेतली. जेवताना पारखून पारखून करवंदे खाण्यास सुरवात केली. एका गुराख्याला एका करवंदावर “ओम” अक्षर आढळले, तर दुसऱ्या एकाला एका करवंदावर नागाची फडी दिसली. इतर गुराख्यांना काहीही दिसले नाही. त्यांना सर्व करवंदे सारखीच दिसली. त्यांनी ती सर्वच्या सर्व खाऊन टाकली. ज्याला “ओम” अक्षर दिसले व ज्याला नागाची फडी दिसली ते दोघे गुराखी महाराजांच्या कडे उठल्या उठल्या पळाले दोघांनीही आपापले दिसलेले वेगळे करवंद महाराजांना दाखविले. ज्याला करवंदावर नागाची फडी दिसली त्याला महाराज म्हणाले,
“तू शिव भक्त होशील. आणि ज्याला “ओम” अक्षर दिसले त्यालाही म्हणालेत तूही तसाच शिवभक्त होशील. त्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडले.
Leave a Reply