महाराजांचे कृपेने असाध्य रोग बरा झाला

महाराजांचे एक सद्‌भक्त श्री दादू दौलू पाटील त्यावेळी मुंबईत राजेश मिलमध्ये नोकरीस होते. महाराज ज्या वेळी मुंबईत येत किंवा ज्या वेळी महाराजांच्या गावी हरीनाम सप्ताह असे त्यावेळी दादू पाटील नेहमी राजेश मिलचे सुपरवायझर यांचे कडे रजेसाठी अर्ज घेऊन जात असत. एकदा असेच महाराज मुंबईस आले असता ते रजेसाठी साहेबाकडे गेले त्यावेळी साहेबांनी त्यांना विचारले की, महाराज माझ्या घरी येतील का? दादू पाटलांनी महाराजांच्या कानावर हि गोष्ट घातली महाराज त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले व एक दिवस दादू बरोबर साहेबांच्या घरी गेले. साहेबांच्या घरातील सर्वजण दर्शन घेऊन गेले व नंतर साहेब एका कृश मुलीस घेऊन महाराजांचे दर्शनासाठी आले व म्हणाले महाराज ही माझी मुलगी गेली बरीच वर्षे आजारी आहे कोणत्याही औषधाचा गुण येत नाही ती मुलगी महाराजांच्या पाया पडली. महाराजांनी तिला विभूती लावली व डोक्यावर हात ठेवला.

त्या दिवसानंतर हळू हळू मुलीची प्रकृती सुधारत गेली व मुलगी एकदम बरी झाली. सुपरवायझर साहेबांना अत्यानंद झाला. त्यांनी दादूस ही गोष्ट स्वतः कथन केली व त्यानंतर दादू म्हणेल तेवढी र॒जा महाराजांच्यासाठी देऊ लागले.

कोणत्याही प्रकारची प्रसिद्धि न करता सहजपणे महाराजाच्या हातून असे अनेक चमत्कार घडून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.