महाराज आमुचा पाठीराखा

महाराजांचा कऱ्हाडचा एक भक्त मुंबईत राहात होता. मुंबईत त्याची स्वतःची एक खोली होती. वीस बाय वीसाच्या खोलीत त्याचा संसार मांडलेला होता. त्यातच बायको, मुले असा त्याचा गोतावळा झोपत होता. मुले किती ? ११ मुले त्याला होती. पाच मुली व सहा मुलगे होते दोघांची लग्ने झाली होती. त्यांची आणखीन तीन मुले होती.

संध्याकाळी ११ वाजता त्यांच्या खोलीचे दार बंद करण्याची पद्धत होती. अकरा वाजण्याच्या आत मुलांनी घरात झोपायला यायचं असा त्यांचा दंडक होता. एकदा काय झालं तर एक सोनू नावाचा मुलगा अकरा वाजता घरात झोपण्यासाठी आला नाही. हे त्यांच्या लक्षात कधी आले? तर झोपताना त्यांनी ऐकून मुले मोजली तेव्हा झोपताना मुले चौदा आहेत ही ती संख्या बघत. सगळ्यांच्या अंगावर एकच एक लांबं पांघरुन घालत असत. मुले मोजली तर ती तेराच होती.

चौदावा सोनू कोठे गेला असा त्यांना प्रश्‍न पडला. त्यांच्या आईने दार उघडून पाहिले तर सोनू नाही. तिने हाका मारल्या तरी नाही. शेवटी रागाने तिने दार धाडकन लावले आणि पुटपुटली,

“कारटी वेळेवर येत नाहीत. दिवसभर काम करुन जीव माझा जातूया. याचं त्यांना काय नाही. मरुदे तिकडं कुठे गेलं असेल तिकडं जाऊ दे किती यांची काळजी करायची ? एकदा देवानं मला मरण दिलं की मी सुटलो. जीव हाय तवर करायचं. पुढचं कुणी बघीतलया, आपण मेलं आणि जगबुडालं.”

परत आईचा जीव र्‍हाईना. तिनं परत बारा वाजता दार उघडलं आणि सोनुला हाक मारली. सोनू पटकन दाराजवळ आला. त्यानं आईकडे बघितलं आणि रडायला सुरुवात केली आईनं त्याला रागान दंडाला धरलं आणि दरादरा ओढीत आत आणलं. आत ओढीत असताना तिनं त्याच्या गळयात एक गोल असा बिल्ला बघितला. त्यावर बालदास महाराजांचा फोटो होता. हे बघितल्यावर तिचा राग थोडा शात झाला. तिन त्याला विचारलं,

“हा तुझ्या गळयात बिल्ला कुणी घातला?”
“एक टक्कल पडलेल्या माणसानं”
“त्याच नाव काय?”

“माहीत नाही. त्याच्या अंगात लांब शर्ट होता पायविजार होती. पायात चप्पल नव्हते. तो खुळयासारखा वाटत होता. तो म्हणाला तुला मी बिल्ला देतो. तो गळयात घालं आणि घरात जा तुझी आई तुला मारणार नही. तुला घरात घेईल. प्रेमानं कवटाळील. परत मात्र घरी यायला असा वेळ करु नकोस. असं म्हणून त्यानं माझ्या गळयात हा बिल्ला घातला.”

सोनुच्या आईला महाराजांची आठवण आली. महाराज आपली किती काळजी घेतात याची तिला मनोमन जाणीव झाली. तिनं सोनुला कवटाळून छातीशी घेतलं आणि अंथरुणात नेऊन झोपवलं. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

“बालदास महाराज आमुचा पाठीराखा.”

Leave a Reply

Your email address will not be published.