एक दिवस टोपलीभर फुले घेऊन कोल्हापुरचा माळी महाराजांच्याकडे आला. त्याने ती टोपलीभर फुलं महाराजांच्या समोर ओतली आणि म्हणाला, “महाराज या फुलांनी आज तुम्ही तुमच्या गुरुंची पूजा बांधावी अशी माझी इच्छा आहे. ” महाराजांना आनंद वाटला पण ते हसत हसत म्हणाले, “ही फुले तूविकत आणलीस की फुकट आणलीस?”
माळी म्हणाला,“ही फुले मी स्वतःच्या बागेतील आणली आहेत. आपल्याविषयी मनात पूज्य आणि शुद्ध भावना ठेऊनच ही फुलांची टोपली मी आणली आहे.”
महाराज म्हणाले, “कितीच्या एस्टीनं आलास ?”
माळी या प्रश्नाचे उत्तर देताना थोडासा गडबडला हे बघून महाराज म्हणाले,
“का बुचकळ्यात पडलास?”
लगेचमाळी उत्तरला, “मी एस्टीनं आलो नाही महाराज. मी कोल्हापूरातून चालत आलो आहे.”
महाराज आश्चर्यानं म्हणाले. “अरे बाबा ! हे सौते ते कोल्हापूर अंतर जवळजवळ ४५ कि.मी. आहे. येवढं तू चालत का आलास ? तुझ्याकडं पैसं नव्हतं काय ?
माळी महाराजांच्या चेहऱ्याकडं बघत म्हणाला, “होय माझ्याकडं पैसे नव्हते. मी एक दोघांकडं उसनं मागितलंही पण दोघांनीही नकार दिला. नंतर मी तिसऱ्याकडं मागण्याचं नाकारलं. फुलांची टोपली डोक्यावर घेऊन ताडकन चालायला सुरुवात केली.”
महाराज म्हणाले, “तू किती वाजता निघालास तेथून ?”
“पहाटे तीनच्या दरम्यान”
महाराज म्हणाले, “खरी भक्ती यालाच म्हणतात, अशा भक्तीच्या मुळाशी श्रद्धा नांदत असते.”
Leave a Reply