झोळीत भात शिजविला

एकदा शिरगावचे बापू महाराज व बालदास महाराज हे दोघेजन कापशीहून सौत्याच्या मठाकडे येत होते. येताना वाटेतच बापू महाराज महाराजांना म्हणाले, “महाराज, मला भूक लागली आहे. मला चालवेनासे झाले आहे.”

बालदास महाराज म्हणाले, “बाटलीतील पाणी पी, म्हणजे तुला तरतरीपणा येईल. का उगीचच नाटक करायला लागलास. खुळया तू कापशीतुन निघतानाच थोडा दहिभात खायचा नाहीस का? तुला आता वाटेत मी काय खायला देऊ?”

बापु महाराज कळवळून बोलले, “मला कायपण खायला द्या. माझा जीव अगदी भेंडाळुन गेलाय. चेष्टेवारी नेऊ नका खरचं कायतरी करा.”

बालदास महाराजांनी बापू महाराजांकडे नजर टाकली आणि फाडकन म्हणाले, “तुझ्यासाठी मुठभर तांदुळ माझ्या झोळीत टाक.”

बापू महाराज म्हणाले,“महाराज तुमच्या झोळीत तांदूळ टाकून काय करु ? तांदूळ शिजायला पाणी, विस्तव, भांड काय पाहिजे का नको?”

बालदास महाराज म्हणाले, “ तू फार लांबचा विचार केलास. तू माझ्या झोळीत तुझ्याकडचे मूठभर तांदूळ टाक म्हटल्यावर टाक. बाकीचा वाडंचार लावू नकोस.”

बापूमहाराजांने मूठभर तांदूळ बालदास महाराजांच्या झोळीत टाकले.

तांदूळ झोळीत टाकल्याबरोबर लगेच बालदास महाराज म्हणाले, “ बापू महाराज, आता झोळीत हात घाला आणि लागल तसा भात खा.”

हे ऐकून बापू महाराज आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी झोळीत हात घातला तर गरम गरम भात त्यांच्या हाताला लागला. रस्त्याच्या वळणावर असलेल्या आंब्याखाली थांबून बापू महाराजांनी भातावर यथेच्छ ताव मारला.

Leave a Reply

Your email address will not be published.