गुराखी गेले म्हऊ जाळायला, पण म्हऊ पळून गेले दुसर्‍या गावाला

बाद्याच्या जंगलात आग्या म्हवाचं पोळं उंच अशा झाडावर होतं. त्या पोळयाचा त्रास जाणायेणाऱ्या माणसांना होऊ लागला. जनावरांनाही त्या आग्या म्हवाच्या मधमाशा चाऊ लागल्या. ही बातमी एका गुराख्याने महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले आपण त्यांचा बंदोबस्त करुया. परत बरेच दिवस झाले तरी महाराजांनी काहीच सांगितले नाही. महाराज काय सांगत नाहीत म्हटल्यावर गुराखी मुलांनी ते आग्या म्हऊ जाळण्याचा निर्णय घेतला. ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. महाराजांनी सर्व गुराखी मुलांना मठात बोलवून घेतले. त्यावेळी एक म्होरक्‍या गुराखी महाराजांना म्हणाला,

“महाराज तुम्ही काहीच केलं नाही. म्हवाचा त्रास आम्हाला आणि आमच्या गुरांना होतोय. ज्यांच्या पोटात दुःखतं तोच दवा मागतो.”

त्या म्होरक्याचे उर्मट उत्तर ऐकून महाराज म्हणाले, “अरे बाळ, तू शांत हो, काय करायचं ते आपण दोन दिवसांत ठरवूया.”

“ठरवायचं काय आम्ही ते आग्या म्हऊ जाळून टाकतो.

“नको”

“का?”

“मी सांगतोय म्हणून,”

“ तुम्ही सांगताय पण आमचं काय? आमच्या जनावरांचं काय?”

“अरे पोरांनो लक्षात घ्या माझा गोतावळाही त्याच रस्त्याने जातो ना?”

“होय, पण तुमच्या जनावरांना आग्या म्हवाच्या माशा चावलेल्या दिसत नाहीत, नाहीतर तुम्ही लगेच तयार झाला असता महाराज,”

“बाळांनो आपण त्या आग्या म्हवाला जाळणे योग्य नाही. त्या मधमाशांच्या जीवाचाही विचार करायला नको का? आपणाला जगण्याचा अधिकार आहे तसाच त्याही मधमाशांना त्याचा अधिकार आहे. त्या म्हवाच्या मध माशांना आपण जाळले तर देव आपणाला माफ करणार नाही. मुलांनो मला तुमची मते समजलीत. तुम्ही सर्वजणांनी त्या आग्या म्हवाला जाळण्याचा निश्‍चयच केलेला दिसतोय. ठीक आहे. उद्या संध्याकाळी तुम्ही सर्वजन मठात या.” असे म्हणून महाराज विश्रांती खोलीत गेले. गुराखी निघुन गेले. जाताना त्यांनी रॉकेल व दिवटे घेऊन उद्याला मठात यायचे असे ठरवले.

दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळी सर्व गुराखी महाराजांच्या सुचनेप्रमाणे मठात आले. येताना प्रत्येकाच्या हातात रॉकेलचा दिवटा होता. दिवटे हातात तयार होते पण ते पेटवायचे फक्त राहिले होते. महाराजांनी हातातील दिवटे बघून खदखदा हसायला सुरवात केली. महाराज म्हणाले,

“अरे शहाण्या मुलांनो, हे हिंसाचाराचे अवडंबर कशाला करायला लागलाय,”

त्या आलेल्या गुराख्या मुलांच्यापैकी एकजण म्हणाला,

“महाराज, म्हऊ जाळण्याशिवाय उपाय काय नाही. आम्ही ते आग्या म्हवं जाळणारचं. तुमच कायबी ऐकणार नाही.” असे म्हणून सर्व गुराखी महाराजांचे दर्शन घेऊन त्या जंगलातील आग्या म्हवाकडे निघाले. मठातून बाहेर पडताना महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले,

“पोरानो म्हव जाळा आणि त्यातील एक मेलेली म्हवाची माशी मला दाखवायला आणा.”

त्या सर्वांचा म्होरक्‍या म्हणाला, “एक का शंभर मेलेल्या माशा दाखवयाला आणतो तुम्हाला.”

“बाळांनो एकच माशी आणा शंभर कशाला.”

म्हऊ ज्या झाडावर बसले होते तेथे सर्व गुराखी आले. सर्वानी आपापले दिवटे पेटवले. त्यातील एक धाडसी गुराखी त्या झाडावर चढू लागला. खालून त्याचे सर्व साथीदार ओरडून म्हणाले,

“बाळू सावकाश चढ, घाई करु नकोस, धट्ट धरत धरत चढ. दिवटा भवतीनं फिरव. माशा न चावतील याची काळजी घे.”

बाळू आग्या म्हऊ जाळण्याच्या त्वेषाने वर वर झाडावर चढू लागला. इच्छित ठिकाणी तो पोचला. तर तेथे त्याला म्हऊ कुठे दिसेना. तो वरुन ओरडला, “अरे लेकानो म्हऊ कुठे आहे ते मला मोठया प्रकाशाच्या बॅटरीने खालून दाखवा.

मला तर येथे म्हऊ दिसत नाही. का लेकांनो झाड चुकलं काय बघा?”

असा प्रश्‍न ऐकून सर्व गुराखी चकित झालेत. एवढयात बाळू वरुन ओरडला,

“अरे लेकांनो, महाराजांनी म्हऊ घालविले असणार. इथ म्हऊ नाही.

बाळू झाडावरुन शरमिंदा होऊन उतरु लागला. उतरताना तो म्हणत होता, “आता महाराजांना आग्या म्हवाची जाळलेली एकतरी मधमाशी कुठली दाखवू.”

सर्वजण सौते मठाच्या दिशेने चालू लागले. मठात आले. मठात येताच महाराज ताडकन विश्रांती खोलीतुन बाहेर आले. सर्व गुराखी आपल्या माना खाली घालून उभे राहिले. महाराज म्हणाले,

“पोरांनो म्हऊ जाळले का ? मला जाळलेली एक मधमाशी दाखवयाला आणलीय का?”

“नाही.”

“का?”

“तेथे झाडावर म्हऊ नव्हते. ते निघून गेले होते.”

महाराज उभे राहून खदाखदा हासत होते आणि खाली चरणावर गुराखी लोळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.