डोंगरातल्या वाटा ज्ञानानं फुलू देत

कोपर्डेचा एक मुंबईवाला भक्‍त महाराजांना भेटण्यासाठी आला. तो मठाला सकाळी ८ वाजता आला. तर महाराज होते बहिरीच्या पठारावर बहिरीच्या देवळाजवळ बसले होते. हातात दासबोध होता. खाद्यावर पांढऱ्या शुभ्र धोतराचा शेव टाकला होता. नजर ग्रंथावर खिळली होती. अशा अवस्थेत महाराज असताना तो मुंबईवाला तेथे पोचला. जवळ उभा राहिला. दहा मिनिटे अंदाजे उभाच होता. तरीपण महाराजांनी त्याला बघितले नाही. त्याला ठसका आला म्हणून तो ठसकला. तो ठसकलेला बघून महाराजांनी तिकडे नजर टाकली. तो न बोलताच उभा होता. महाराज क्षणभर दृष्टि वळवून म्हणाले, “इथं बस.”

तो बसून राहिला. महाराजाचा अध्याय संपल्यानंतर महाराज म्हणाले, “ तू का आलास?”

“आपणाला भेटून व आपले दर्शन घेऊन पाचसहा महिने झाले. केवल मी दर्शनासाठी आलोय महाराज.”

“आरं. तुम्ही मुंबईवाली माणसं तुम्हाला गावाकडं यायला वेळ कुठला मिळतोय. तरीपण येळ काढून आलास ही चांगलीस गोष्ट आहे. गावाकडं यावं पांढरीच्या देवांना निवद नारळ दयावा. गावकऱ्यांना तोंड दाखवावं. आपल्या आठवणींना उजाळा दयावा हे सारं आपल्या हातून झालं की माणसाला एक समाधान वाटतं.”

“होय महाराज पण पोटाच्या मागे लागलेल्या हया डोंगरातल्या लेकराला रजा नको का मिळायला? हेच आपल्या हातात नाही. नाहीतर नोकरीला मुकावं लागेल. मग मी तरी काय करु?”

“हे तू गडया माझ्या अंतरीचे बोल बोललास बघ, मी सकाळी रामाच्या पाऱ्यात उठून इथं बहिरीदेवाच्या पठारावर का आलोय?”

“एकांतात ग्रंथ वाचायसाठी तुम्ही आलाय.”

होय, पण दुसरीही गोष्ट लक्षात घे. इथं वाचन झालं की डोंगराकडे नजर टाकतो. डोंगरातल्या पायवाटा बघतो. नागीनीसारख्या आडव्या तिडव्या गेलेल्या पायावाटा बघत बघत मी विचार करतो.”

“काय? काय विचार करता महाराज?”

“आरं, हया वाटा रिकाम्या का? हयावर गवत नाहीतर अन्य वनस्पती कशा काय उगवलेल्या नाहीत.”

“महाराज, त्या वाटा झणझणीत मळलेल्या आहेत. त्या मळून मळून टणटणीत झाल्यात. त्यामुळे त्यावर कुठलेही बीज रुजत नाही, त्यामुळे त्या रिकाम्या आहेत.”

“आरं! त्या पायवाटा डोंगरातल्या पायवाटा आहेत. काटयाकुटयातून मार्ग काढीत पुढं जाणाऱ्या त्या पायवाटा आहेत. या पायवाटा बरंच काय सांगतात. आपण काटयाकुटयांतून मार्ग काढत पुढं जावं आणि दुसऱ्यांना मार्ग दाखवावां असं हया पायवाटा सांगतात. त्या स्वत:च्या अंगावर जनावरांची माणसांची पावले आनंदाने झेलतात. स्वतः परोपकाराचा आनंद लुटतात. आपलं आयुष्य जणकल्याणार्थ आहे असं टाहो फोडून सांगतात.

या पायवाटांनी किती कष्ट सहन करायचं त्यांना सुख माहीती नाही. जन्मभर दुसऱ्यासाठी कष्टच कष्ट!”

“मग महाराज या पायवाटांनी काय करावंस तुम्हाला वाटतं?”

“मला त्यांनी काहीही करु नये असं वाटतं, जगासाठी किती राबायचं त्यांनी स्वत:साठी काहीच करायचं नाही का ? नाही, नाही यातून कायतरी मार्ग निघाला पाहिजे,”

“कसला मार्ग महाराज?”

“पायवाटांच्या सुखाचा मार्ग,

या पायवाटा पायवाटा न राहता त्या ज्ञानानं फुललेल्या ज्ञानवाटा झाल्या पाहिजेत, त्यासाठी मला प्रयत्न केला पाहिजे. मी जास्त शिकलो नाही किंवा जास्त शिकून बॅरीस्टरही झालो नाही. पण अंतरीची तळमळ राहात नाही. या डोंगराळ भागातून कुठूनतरी डोंगरातून ज्ञानगंगेचा उगम झाला पाहिजे. त्यासाठी मला कायतरी केलं पाहिजे.”

“महाराज, तुम्ही डोंगरातला माणूस माणूस जगला पाहिजे यासाठी धडपडताय. तुमचं अंत:करण तीळ तीळ तुटतंया हे ऐकून मी अचंबित झालो आहे. महाराज, आपली इच्छा आहे तर मार्ग सापडणारच एक दिवस असा उजाडेल की डोंगरतल्या तुमच्या अंतःकरणात रुजलेल्या पायवाटा हया पायवाटा न राहता त्या ज्ञानाने फुललेल्या ज्ञानवाटा बनतील.”

मुंबईवाला होकारात्मक बोलला महाराजांना आनंद झाला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसत होता की जणू काय त्यांच्या समोरुन डोंगरातून ज्ञानगंगाच वाहत आहे. आणि त्यांच्या समोरील डोंगरातील पायवाटा हया ज्ञानाने फुलल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.