लहर येईल तेव्हा महाराज नृसिंहवाडीला जात. एकदा महाराज पहाटे तीन वाजता उठले आणि प्रातःविधी आटोपून बांबवडयाला चालत आले. साडेचारच्या सुमारास त्यांनी एका भक्तांच्या दारात उभे राहून त्याला हाक दिली. तो पळतच बाहेर आला. त्याला म्हणाले, “भिवा , चल आटप.”
“कुठे ?”
“वाडीला जायचं.”
“आज अचानक काय हे?”
“होय बाबा. आरं देवाला भेटायला काळ येळ काय नसते. देव कवाबी भक्ताला भेटतो.”
“बरं, जाऊया. पण जायचं कसं?”
“कसं म्हणजे पायानं चालत.”
“येवढं अंतर पायानं ?”
“होय.”
“चला तर. आपण किती वाजता पोचायचंय?
“संध्याकाळापर्यंत”
“परत यायचं नाही काय?”
“नाही.”
“का नाही म्हणून विचारलं नाहीस?”
“होय आपण परत का यायचं नाही.”
“अरे, बाबा. आज कोजागिरी पौर्णिमा आहे.
या पौर्णिमेच्या चांदण्यात श्री गुरुदेव दत्त कसा न्हाऊन घेतो ते बघायचं. घाटावर पांढऱ्याशुभ्र चांदण्यात गुरुमहाराजांचं शिखर कसं तळपतंय ते शांतपणानं अनुभवायचंय. शांत चांदण्यात तेथे नांदायला येणारी शांती शांतपणाने अनुभवायची. त्या ठिकाणचं सुख सांगत बसायला नको. चल पटकन.”
भिवाने कपडे घातली, अंथरुन पांघरुन घेतलं आणि निघाला. सायंकाळी सहाच्या सुमारास नृसिंहवाडीच्या घाटावर आलीत. घाटावर इतरही लोक चांदण्यात बसले होते. इतरांच्यापासून थोडे बाजूला महाराज बसले. शांत चांदण्यात शांतपणे एकाग्र झाले. शीतल चांदणे पांढऱ्याशुभ्र दुधाची पांढऱ्याशुभ्र तांदळाच्या पिठाची, पांढर्या चांदीच्या रुपयाची क्षणभर आठवण करुन देते होते. भिवा अंथरुन टाकुन बसला. बघता बघता न खतापिताच गाढ झोपला. महाराज पहाटे चारपर्यंत पद्मासन घालून बसले होते महाराजांनी चार वाजता इकडे तिकडे बघितले. तर भिवा झोपला होता. भिवाला म्हणाले,
“ भिवा कोजागिरी पौर्णिमेचे चांदणे तू बघितलेस. पण त्याचे सुख बघितले नाहीस. तु झोपलास आणि सर्व सुखला मुकलास, खुळया तुला खूप अनुभवता आलं असतं पण तू गमवून बसलास. या घाटावर स्वर्गीय सुख तू लाथाडून बसलास.
“होय महाराज मला माफ करा. मी आधाशा सारखा झोपलो.”
“अरे तुला मी येथे घाटावर झोपायला आणले नव्हते. तर सुखाचा महासागर अनुभवायला आणले होते. आता पश्चाताप करुन काय उपयोग? “जब चूग गयी चिडिया खेत.”
Leave a Reply