महाराज सौते गावच्या मठात असताना त्यांच्याकडे सहासात मांजरे होती. सगळ्या मांजरांची त्यांनी नावे ठेवली होती. ज्या मांजराचे महाराज नाव घेत ते मांजर त्यांच्याजवळ लाडकत येत असे. मनी आणि सुंदरी ही दोन मांजरे महाराजांना जास्त प्रिय होती. एक कुत्रे ही महाराजांनी मठात पाळले होते. त्यांचे नाव मोती ठेवले होते.
एकदा मठात मुंबईचा भक्त आला म्हणुन महाराजांनी चुलीवर चहा ठेवला. चहा ठेवुन महाराज छोटेसे लाकूड तोडत होते. येवढयात इकडे चहा ऊतू चालला. ते बघून महाराज ओरडलेत, “मोती चहा बघ ओतु गेला.”
महाराजांचे शब्द ऐकुन मोती पळत चुलीकडे गेला व त्याने चुलीवरचे चहाचे पातेले जबडयात धरुन पटकन उतरुन जमिनीला ठेवले. हे दृश्य बघून मुंबईच्या भक्ताला आश्चर्य वाटले. येवढयात दुसरी घटना घडली मठात एक उंदीर सुसाट पळत आला. चुलीकडे बसलेल्या मनीने तो बघितला व पाठीमागे लागली. महाराज ओरडले, “मनी, मनी मारु नकोस. हुसकवून घालव.” मनीने पाठलाग करुन तोंडात धरलेला उंदीर पटकन सोडला. उंदीर मठातून बाहेर पळून गेला.
लाकूड फोडून महाराज चुलीजवळ आले आणि मुंबईच्या भक्ताला चहा देऊ लागले. तो भक्त म्हणाला. “महाराज मुक्या प्राण्याला किती तुम्ही चांगलं वळण लावलंय.”
महाराज म्हणाले, “वळण लावण्यावर आणि लागल्यावर प्रत्येकाचं आयुष्य उज्ज्वल होतं. चांगले संस्कार चांगल्या ध्येयाकडे नेतात, आयुष्याचं सोनं करतात.”
Leave a Reply