बैलाबरोबर नांगर ओढला, शेतकर्‍याला आशीर्वाद दिला

बालदास महाराज एकदा सौत्यातून साखरप्याला चालत निघाले. बरोबर त्यांचा जवळचा भक्त बाळू पाटील होता. जूनचा पहिला आठवडा होता. अंदाजे जूनची दोन तारीख असावी. वातावरण थंड होतं. मृगाचा पाऊस चालू होण्याच्या मार्गावर होता. पण अजून पावसाला तसा चारसहा दिवस अवकाश होता.

साखरप्याजवळ महाराज व बाळू पाटील चालत आसताना तेथेच शिवारात एक शेतकरी नांगर हाकत होता. तो बिचारा घामाघूम झाला होता. टपटप घामाचे थेंब चेहऱ्यावरुन खाली ओघळत होते. पण तो उसंत न खाता आपले काम एकाग्रतेने करीत होता. महाराजांनी हे दृश्य रस्त्याच्या कडेला खीनभर उभं राहून पाहिलं. त्यांच्या मनात काय आले माहीत नाही लगेच महाराज त्या नांगरणाऱ्या शेतकऱ्याजवळ पोचले. त्या शेतकऱयाचा उजवीकडचा एक बैल लंगडत होता. महाराज त्या शेतकऱ्याला म्हणाले, “अरे बाबा, तूझ्या उजव्या बाजूचा एक बैल लंगडतोय. त्याला नीट चालता येईना. तू त्याला भरभर नांगर ओढावा म्हणून चाबकाने मारतोस हे चांगले नाही. तो बैल चुकारपणा करतोय का?”

“नाही”

“मग तू त्याला चाबकाने का मारतोस? ज्याच्याने जे जमतेय ते तो करतोय नं? त्याचा काय दोष?”

महाराज, मी शेतकरी आहे. तुम्हाला जे कळतंय त्यापेक्षा मला जास्त कळतयं हे लक्षात घ्या पण मी तरी काय करु ? आता मृगाचा पाऊस चार-सहा दिवसांत चालू होईल. येळंवर मशागत होऊन भात पेरणी झाली पाहिजे. न्हाईतर वराती मागून घोडं न्हेऊन काय उपयोगाचं. मग मी पोटाला काय खाणार. चार पोरंबी पदरात हाईत “ हे तुझं खरं आहे, पण बैलाचं दु:ख तू समजून घे की, फडाफडा मारुन तेची ताकद कमी करु नकोस.”

“महाराज, मग मी नांगर ओढू काय?

आता किती र्‍हायलंय ? चार गुंठ रान. होईल तासाभरात. मग निवांत विसावा घेऊ दे”

“मी त्याचे हाल बघून गहिवरलोय मला फार वाईट वाटतंय.”

“मग महाराज तुम्हीतरी त्याच्या बदलाला नांगर ओढा नाहीतर मला तरी ओढला पाहिजे.”

“मी नांगर त्याच्या बदलाला ओढतो. तुझ्यानं जमणार नाही. मला देवानं दिलेल्या ताकतीचा मीच उपयोग करतो.”

महाराजांनी उजव्या बाजूचा लंगडतेला बैल शेतकऱ्याला सोडायला लावला. तेथे आपण खांदा दिला. लंगडतेल्या बैलाचे जू महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतले. त्याची सापती उजव्या हातात धरली. जू खांद्यावर मजबूत असं घेतलं आणि शेतकऱ्याला नांगर टाकायला सांगितल. महाराज आपल्या जोडीदार बैलाबरोबर ताकदीने एक एक पाऊल पुढे टाकू लागले. नांगर वळून परत आला तेव्हा बैलाची ताकद कमी वाटत होती व महाराजांची ताकद जास्त जाणवत होती.

न थांबता चार गुंठे रान महाराजांनी जोडीदार बैलाच्या मदतीने त्या शेतकऱ्याला नांगरुन दिले. नांगरुन झाल्यावर शेतकरी म्हणाला, “महाराज, आपण दयावान दिसता. आपल्या दिव्यशक्‍तीने मी भारावून गेलोय. आपले उपकार मी जन्मात विसरणार नाही.”

“माझे उपकार नव्हेत हे देवाचे उपकार मान.” असे बोलून महाराजांनी आपल्या डोक्यावर बांधलेल्या जटा जमिनीवर खाली सोडल्या. त्या लांबलचक काळयाभोर जटांचे तेज बघून तो शेतकरी अश्चर्यचकित झाला. त्याने क्षणात महाराजांचे पाय धरले.

महाराज त्याला म्हणाले, “या शेतात तुला जे भात होते त्याच्या पाचपट भात यंदा जास्त होईल. सुखानं खा. पण देवाला विसरु नकोस.”

Leave a Reply

Your email address will not be published.