प. पू. बालदास महाराज यांची मध्यान्ह आरती

जय जय जय करुणाकर स्वामी बालदास वंदे |
त्रिवार वंदन तुला त्रिवार वंदन तुला
आरती करितो स्वानंदे आरती करितो स्वानंदे || धृ || जय जय
आदिनाथ गुरु सकल जगाचा त्यानें धारियलें
कठोर व्रतपालनार्थ भूवरीं मच्छिंद्रा नेले
आज्ञा करुनी जनकल्याणास्तव पंथा स्थापियलें
शिवाज्ञा मानुनी शिवाज्ञा मानुनी यतिवरें पंथा उभविलें || १ || जय
पंथ पुढे चालण्या ईश्‍वरें नऊ नाथ केले
मच्छिंद्राकारणे सकळिकां नाथज्ञान झालें
योगबलाने नवनाथांनी त्रिखंड जिंकियलें
हर्याज्ञा मानुनी हर्याज्ञा मानुनी संकटी अनाथ सांवरिले || २ || जय
योगशक्‍तीच्या अविष्कारे देवां दिपविलें
अस्त्रबलाच्या सार्मर्थ्याने जगतां नमविलें
शाबरीविद्या प्रमाण करुनी त्रिभूवन मोहविलें
नाथाज्ञा मानुनी नाथाज्ञा मानुनी त्रिलोकीं ज्ञानामृत वर्षिलें || ३ || जय
नाथपंथीच्या ज्ञानाला जे शरणागत झाले
शृंगी कंथी परंपरेला शिरोधार्य केले
ऐसे ऋषीमुनी आश्रमवासी चिरंतनी झाले
पंथाज्ञा मानुनी पंथाज्ञा मानुनी ऋषिवरे शिष्या बोधियले || ४ || जय
शिष्य महत्तम नाथा-पंथी अव्याहत झाले
सांप्रदायीनी विद्या स्मरुनी जांगलिक ठेले
पुण्यपत्तनी आश्रम करुनी योगार्जित झाले
योगाज्ञा मानुनी योगाज्ञा मानुनी कृष्णदां शिष्यत्व दिधलें  || ५ || जय
दैवी सनाथी विद्या घेऊनी कृष्णदास आले
सौतेग्रामीं गोधन अवघें सोडुनिया दिधले
गोरक्षण कारणें बालंदा अनुग्रहित केले
धर्माज्ञा मानुनी धर्माज्ञा मानुनी बालकां ज्ञानवंत केले || ६ || जय
पूर्वप्रचिति जाणून देवें कुळासी उद्धरिलें
गोधन रक्षुनी अपार सद्गुरुनाथा तोषविलें
आश्रम घेऊनी निरंतरी सत्कार्या चालविले
गुर्वाज्ञा मानुनी सर्वथा जनहित रक्षयिले || ७ || जय
शिष्यधर्म पाळण्यांबालकें एकचित्तें केलें
अन्न त्यागुनी दिलें परि नच गुरुला त्यागियलें
स्वामिभक्तिसवें अवसरें तीर्थाटन केलें
देवाज्ञा मानुनी देवाज्ञा मानुनी योगिवरें भक्तां तारियले || ८ ||
जनसेवेस्तव देह झिजविला चंदन परिमाळिलें
सौते शिरगाव पंचक्रोशी भक्तिरसें भरलें
बालदास महाराज मुनिवरें चैतन्यचि केलें
कालाज्ञा मानुनी कालाज्ञा मानुनी महाराज संजीवन जाहले || ९ || जय
अघटित लीला करुनी बालदास ज्योतिर्मय झाले
संजीवन लहरी उत्थापुनी प्रत्यंतर दिधले
प्रेमानंदा प्रेमें नयन-पथ-गामी केले
प्रेमानंदे भावें प्रेमानंदे भावें यतिवरां साष्टांगी नमिलें || १० || जय

– कै. प्रेमानंद मयेकर (मुंबई)