शाहूवाडी तालुक्यातील शिरगांव गाव हे मोजकीच लोकसंख्या असलेले १२ बलुतेदारांच्या १२ गल्ल्यांनी वसलेले गाव. लांबलचक सरळ रस्ते, एका रांगेत लहान-मोठी घरे आणि १२ गल्ल्यांच्या मधोमध श्री निनाई देवीचे मंदिर. गावाच्या सभोवताली काळी कसदार सुपिक जमिन. पावसाळयात आणि हिवाळयात या जमिनीचा थाट काही औरच असतो. अनेक पिकांनी, फुलांनी, हिरव्या गार पानांनी आच्छादून गेलेली शेती. जणू हिरेजडीत रंगीबेरंगी माणिकमोती लावलेली हिरवीगार पैठणीच परीधान केल्यासारखी वाटते. मर्यादित लोकसंख्या असलेले गाव तसे खुपच चांगले आहे. पण या गावाची कहानी इतर गावांपेक्षा खूपच निराळी आहे. उन्हाळयाची चाहूल लागताच ओढयाचे पाणी आटून जाते. नदी हळूहळू कोरडी पडते. गावातील प्रत्येक स्त्री-पुरुषांना, मुला-बाळांना, गुरा-ढोरांना तारेवरची कसरत करुन दाही दिशा वन वन भटकावे लागत असे.
अवघे झाले जीर्णशिर्ण अन्, सुन्न झाल्या दिशा |
खुप सोसले आता, झाली तहान माझी आशा ||
कोंबडा आरवण्याच्या अगोदर धुंदरुक (पहाट) व्हायच्या आत गावातील स्त्री-पुरुष साखर झोपेतून उठून पाण्यासाठी ओढयावर किंवा नदीवर जात असत. ओढयात झरे काढून नारळाच्या करवंटीने पाणी भरुन एक जरी घागर भरली तरी समाधानाने घरी परतत असत. घरातील शेतातील हातची कामे सोडून दिसरात पाण्यासाठी बायकांची त्रेधातिरपीट उडायची. रणरणत्या उन्हाळयात कोरडया ठणठणीत पडलेल्या नदीकडे पाहून तहानेने व्याकूळ झालेल्या गावकऱ्यांच्या मनाला तडे पडत. सर्व गावकरी एकत्र येऊन नदी मध्ये खोलवर खोदून आडी काढत असत. पण त्यामध्ये सुद्धा पुरेशे पाणी मिळत नसे. या प्रसंगावरुन गावकऱ्यांमधील एकजूटीची भावना प्रकर्षाने जाणवायची. कुरणाच्या माळावर, जोगदऱ्यात, रांजणावर, निडात, कुंभार झऱ्यात झरे काढून गावकरी गुरांच्या पाण्याची सोय करायचे. तरी सुद्धा पुरेसे पाणी मिळत नसे. गावातील बायका कपडे धुण्यासाठी व पुरुष आंघोळ करण्यासाठी दुसऱ्या गावातील हहीपर्यंत जायचे.
गावाची अशी हालाखीची परिस्थीती पाहून दुसऱ्या गावातील गावकरी शिरगावात मुलींची लग्न करण्यासाठी चौफेर विचार करुन मुली द्यायला तयार होत नसत. पाणी टंचाईचा कहर झाल्यामुळे शिरगांव ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांनी ओढयात आड (विहीर) बांधली. पण त्याला सुद्धा पुरेसे पाणी लागले नाही.
या कोरडया दुष्काळाच्या झळांचे चटके पाहून प.पू. बालदास महाराज यांनी शिरगावच्या गावकऱ्यांना एकत्र करुन परत विहीरीचे खोदकाम सुरु केले. महाराजांनी स्वतः जातीने लक्ष घालून दिवस रात्र एक करुन कामावर देखरेख ठेवली. काम सुरु असताना स्वतः स्वखर्चाने गावकऱ्यांच्या मनाला थोडासा थंडावा मिळावा म्हणून लिंबू सरबताचे वाटप करत असत. प.पू. महाराजांच्या लाख मोलाच्या आशिर्वादाने विहीरीला भरपूर पाणी लागले.
महाराजांची नजर दूरदृष्टीची व विचरसरणी भविष्यवेधी होती. त्यामुळे १९५८ च्या कालखंडात विहीरीला पाणी लागल्यानंतर त्यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी एका सुखदायक कल्पनेचा उगम झाला. ती कल्पना म्हणजे श्री. निनाई मंदिराजवळ एक मोठी पाण्याची टाकी बांधायची. त्या टाकीत विहीरीचे पाणी नळाने सोडायचे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात पाईपलाईन टाकून ठाराविक ठिकाणी सामूदायिक नळ योजना राबवायची अशी त्यांची विचारसरणी होती. काही अपरिहार्य कारणांमुळे ही योजना आमलात आली नाही.
हिरा जरी कोळश्यामध्ये असला तरी तो आपला चमकणे हा धर्मगुण सोडत नाही. योगीराज बालदास महाराजांचेही असेच आहे. त्यांचे महात्म्य आणि चमत्कार आजतागायत आपल्या सर्वांच्या अंत:करणात दृढ आहेत.
|| जय योगीराज ||
Leave a Reply