रामचंद्र पाटील (शिरगाव) हे मलकापूरला हायस्कूलमध्ये शिकत होते. एप्रिल महिना होता. सकाळी शाळा भरे व बारा वाजता सुटे. शाळेतून बाहेर पडायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला रस्त्यानं मलकापूरकडून शिरगावाकडे यायला निघाले. ऊन मी म्हणत होते. वाटेला तहान खूप लागली. रामचंद्र पाटलांच्या तोंडाला कोरड पडली, त्यांना पाणी पाणी करण्याची वेळ आली. पण रस्त्यात कोठेही पाण्याची सोय नव्हती. वाटेत विहीरीच्या पाण्याचा पाट नव्हता की नदीच्या पाण्याचा पाट नव्हता. त्यांचा जीव कासावीस झाला होता. काय करावे हे त्यांना सूचेना. येवढयात रामचंद्र पाटलांना कुणी तरी हाक मारली, “रामा थांब.”
पाठीमागे रामचंद्र पाटील फिरुन बघतात तर बऱ्याच अंतरावर नजरेच्या टप्प्याच्या बाहेर महाराज दिसले. रामचंद्र पाटील रस्त्यातच हाकेसरशी थांबलेत. महाराज भरभर रामचंद्र पाटलांच्याजवळ आले. महाराज जवळ येताच रामचंद्र पाटील म्हणाले,
“महाराज मला खूप तहान लागलीया माझा जीव कासावीस झालाय. मला पाणी पाहिजे आहे. महाराज म्हणाले,
“रामा चल तुला पाणी देतो. महाराजांनी रस्त्यावरच्या एका झाडाखाली त्यांना आणले. तेथे त्यांच्या हातावर पांढरा खडीसाखरेचा खडा ठेवला. तो त्यांनी तोंडात घातला तर तो गोड नव्हता. मात्र खडा चोकील तसे त्यातून पाणी मिळत होते. रामचंद्र पाटलांना तांब्याभर पाणी प्याल्यासारखा आनंद वाटला. चेहरा ताजातवाना झाला.
महाराज म्हणाले, “आरं रामा तहान भागली का? का आणि पाणी पाहिजे?”
“नको नको भरपूर पाणी प्यालो. पोट पाण्यानं भरुन गेलंय. आत्मा थंडगार झाला.”
हा अनुभव बालवयात रामचंद्र पाटलांनी अनुभवल्यापासून रामचंद्र पाटील महाराजांच्या सौते मठाकडे जायला लागले.
Leave a Reply