गाढवाचा आत्मा जाणला

रामचंद्र पाटील व काही मुले शिरगावहून सौत्याला चालत येत होती. वाटेला गाढवांचा कळप आढळला. त्यांच्या पाठीवर बेलदारांनी दगडे ठेवली होती. ते दगड वाहून नेण्याचे काम ती गाढवे करीत होती. त्या काळपात एक पाय मोडके लंगडे गाढव होते. ते लंगडे असुन त्याच्या पाठीवर बेलदाराने मारुन मारुन जखमा केल्या होत्या. ते सर्व कळपात चालताना पाठीमागे राहात होते. आणि त्यामुळे बदाबदा मार खात होते. त्याच्या पाठीवर माशा घोंगावत होत्या. महाराजांनी हे दृश्य निरखून पाहिले आणि बेलदाराला म्हणाले,

“अरे बिचाऱ्या त्या बिचाऱ्या गाढवाला किती मारतोस? त्याला मारु नकोस मला ते गाढव विकत दे.”

“महाराज लंगडे गाढव विकत घेऊन काय उपयोग? त्यापेक्षा यातलं चांगलं गाढव घ्या.”

“अरे, नको मला तुझे चांगले गाढव. मला तुझे लंगडे, जखमा झालेले मरतुंगडे गाढवच हवे आहे.”

“बरं महाराज तुमची मर्जी. लंगडे गाढव घ्या. बोला किती देता?”

“तू बोल किती देऊ?”

“पन्नास रुपये द्या.”

महाराजांनी पटकन झोळीतून पन्नास रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. बरोबर असलेल्या मुलांना महाराज म्हणाले, “चला रे, बाळांनो ! गाढवाच्या पाठीवरील दगड काढा. त्याला हाकत हाकत मठाकडे न्या.”

मुलांनी गाढव मठाजवळ आणून बांधले. मुलांनी त्याला पाणी पाजले. हिरवी वैरण घातली. पाठीवरील जखमावर हळद घातली. गाढवाचा आनंदी चेहरा बघुन महाराजांना वाटले. येथुन पुढे महाराज दररोज गाढवाला डाळगूळ देवू लागले. हिरवी वैरणही घालू लागले. महिन्याभरात गाढव धष्टपुष्ट झाल्यामुळे ते जोरात खेकाळू लागले. त्याच्या ओरडण्याचा (खेकाळण्याचा) त्रास वाटू लागला. म्हणून नंतर महाराजांनी त्या गाढवाला मोकळे सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.