सौते गावच्या शेजारील गावची एक हौसा नावाची बाई कडवी नदीत जीव देण्यासाठी निघली. जाता जाता तिला महाराजांचे दर्शन घेऊन आपले जीवन संपवावे असे वाटले. ती नदीवरुन थेट सौते गावच्या महाराजांच्या मठात आली तर महाराज गवत कापण्यासाठी बाद्याच्या जंगलात गेलेत असे समजले. ती पायवाटेने तिकडे निघाली वाटेतच महाराज गवताचा भारा डोक्यावर घेऊन येताना आढळले. महाराजांना ती म्हणाली,
“एवढा मोठा गवताचा भारा घेऊन कुणीकडे निघालात” महाराज म्हणाले, “माझ्या कुटुंबाला जगवण्यासाठी हा गवताचा भारा घेऊन निघालूया.”
ती थोडी कोडयात पडली. महाराज काय म्हणत्यात ते तिला कळेनासे झाले. कावरीबावरी होऊन तिनं महाराजांना विचारलं, “महाराज तुम्ही काय म्हणताय ते मला काय बी कळत नाही. कुटुंबासाठी गवताचा भारा घेऊन निघालाय याचा अर्थ काय?”
महाराजांनी सवते गावच्या उतरंणीला असलेल्या दारुडयाच्या आंब्याखाली असलेल्या प्रचंड दगडावर भारा उतरला आणि महाराज तेथेच भाऱ्या शेजारी बसले. महाराज त्या हौसाला हसत हसत म्हणाले, “ हौसा, माझं कुटुंब म्हणजेच माझा जनावरांचा गोतावळा. माझा गोतावळा सांभळण्यासाठी मला हे काम करावं लागतं. बरं तर तू निघालीस कुणीकडं?”
हौसाला रडु कोसळलं. ती हुंदकं देत म्हणाली, “ महाराज मी आयुष्याचा शेवट करायला निघालीया. नवरा कवडीची कमाई करत नाही. दारु पितो. मारमार मारतो. तीन पोरं पदरात हाईत. एकाला कपडा हाय तर दुसरं उघडं नागडं फिरतंया. मी लोकांचा रोजगार करुन पोरं जगवतुया. ते पण करुन दीना झालाय. सारखा घरात हैदोस घालतुया. सगळया पाहुण्यापयांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यो कोणालाच भिक घालत नाही. मी दमले, शिणले, वैतागुन गेलेय आणि म्हणूनच आयुष्याचा शेवट करायला निघालेय. जाताना तुमचे दर्शन घेऊन जावे असा विचार मनात आला. केवळ अखेरच्या दर्शनासाठी मी तुम्हाला शोधत आलोय.”
महाराजांनी हौसाचे बोलणे ऐकल आणि खदाखदा हसू लागले.
महाराज हौसाला म्हणाले, “आगं खुळे, यालाच संसार म्हणतात. संसारात अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. संकटांना सामोरे जावे लागते. जीवाचं रान करुन संसार उभा करावा लागतो. मोडणारा संसार वाचवावा लागतो. संसारात सुख राळया येवढे आहे पण संकटं पर्वतायेवढी आहेत. या संकटांत हसत हसत जगायचं असतं. संसाराला पाठ फिरवून पळायचं नसतं. नाहीतर मग तू हा संसार मांडलासच का? आता तुला तुझा संसार अर्ध्यावर सोडून जाता येणार नाही.”
“हौसाला हे विचार पटल्यासारख झाले. ती मनात विचार करता करता फाडकन म्हणाली,
“माझ्यानं हे सोसणार नाही. जीव देऊन या जगातून जाणं हेच मला सोपं हाय.”
म्हराज म्हणाले,“ हौसा, जीव कुणी द्यावा. जी बाई माणसात वागायला लायक नाही जी आपल्या वागण्यात समाजमान्य बदल करु शकत नाही तिनं जीव द्यायचा असतो. तुझ्या सारख्या पतित्रतेनं हे करायचं नसतं. तुझ्या दुःखाचा मी सोबती आहे. मी तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करतो. तोउद्यापासून दारु पिणार नाही. तो कामाला जाईल.
तू उद्यापासून पाच मिनिटं वेळ काढून देवाचा जप करत जा. तुझं मन शांत होईल. तुझ्या घरी हळू हळू सुख नांदायला येईल. पण लक्षात ठेव देवाची ओळख विसरु नको.”
महाराजांचे साधे, सोपे पण मार्मिक विचार हौसाला पटले. हौसा महाराजांचे दर्शन घेऊन घराकडे परतली. हौसा सुखाने नांदू लागली.
सुखात नांदताना ती देवाचे नामस्मरण कधीच विसरली नाही.
Leave a Reply