ताराची म्हैस आडली, तारा घळाघळा रडली

गाडयाच्या वाडीची ताराबाई नावाची एक महाराजांची भक्‍तीन होती. ती वर्षातून सवडीनुसार तीन चार वेळा सौत्याच्या मठाकडे भक्तीभावाने यायची. येताना महाराजाच्या मठात तुपाची वात काही दिवस लागावी म्हणून ती घरात साठलेलं तूप घेऊन यायची उदबत्तीचा मोठयात मोठा चांगला सुवासिक वासाचा पुडा घेऊन यायला विसरायची नाही. खडीसाखर, नारळ आणि कापूर हे तर ती येताना घ्यायला कधीच विसरली नाही. मठात यायचं म्हटलं की ती सर्व तयारी आदल्या दिवशीच करुन ठेवायची. तिला महाराजांचा सहवास म्हणजे साक्षात देवाचा सहवास वाटायचा. ती काही वेळेला मठात येताच म्हणायची,

“माझ्या देवासाठी मी चालत आलोय. माझ्या देवाला कधी बघीलसं झालंतं.” असं म्हणून महाराजांचे पाय धरायची.

एक दिवस ताराबाईवर बिकट प्रसंग आला. तिची म्हैस आडली. म्हैस आडली आणि असहय वेदनानं गोठयात लोळू लागली. म्हैस बेरडू लागली. ताराला काय करावं हे सुचेना. शेजापाजारी पंधरावीस मैलावर कोणी जनावरांचा डॉक्टर नव्हता. शिवशेजारी कुणी त्यातला जाणकार माणूसही नव्हता. तिचं डोकं चक्रम व्हायची पाळी आली.

तरीपण तिला देवानं बुद्धी दिली आणि तिला महाराजांच्या मठाची आठवण झाली. मोठा पोरगा तानाजीला तिनं गोठयात थांबायला लावलं आणि ती पायातल्या चपल्या हातात घेऊन गावाच्या बाहेर पळत आली. गावाच्या बाहेर आल्यानंतर तिनं पायात चपल्या घातल्या नि वाऱ्यासारखी धूम ठोकीत ती मठाकडे आली.

महाराजांनी ताराला बघितले आणि म्हणाले, “ताराबाई तू का आलीस. आणि तुझ्या डोळयात पाणी का? काय येवढ संकट कोसळलं तुझ्यावर? सांग तरी काय झालं ते?”

“काय सांगू महाराज, अंगावरचं दागिने घानवट ठेऊन दुसरी म्हस घेतलीया. चांगली तानपी हाय. दिवस भरलेत आणि काल व्यायला लागली तर व्येता व्येता ती आडली आणि खाली गोटयात धाडकन पडली. सारखी लोळत पडलीया माझ्या तान्याला गोटयात बसवून मी इकडे पळत आलुया. तरी कायपन करा महाराज पण माझी म्हस यातुन सुटली पाहिजे, न्हायतर माझं समधं घर बुडलं महाराज. कायपन करा महाराज पण माझ्या म्हसीला तेवढी मोकळी कराहो.”

महाराजांनी डोळे मिटून “शंभो” असा आवाज दिला. लगेच डोळे उघडून महाराज ताराला म्हणाले,

“तारा तू घरी जा. तुझी म्हैस मोकळी झालीया, तिला गुलजार कुरळया केसाची रेडी झालीया. आता तुला देवानं रेडी म्हणजी म्हैस दिलीया. तुझ्या घरात आता दहयादुधाचा पूर येईल ऊठ जा. पहिली धार काढून खरवीज कर जा अन्‌ शेजापाजाऱ्यांना वाट जा.”

तारा उठली. महाराजांचे दर्शन घेऊन घराकडे पळाली. घरात आली. म्हैस उठून उभी राहिली होती. घास घास गवत खात होती. ताराला बघुन ती ओरडली. ताराचा जीव भांडयात पडला. तारानं रेडीला मायेनं कुरवाळलं. जवळ घेतलं. अंगावर पटकुर झाकलं. तिनं धार काढली. चुलीवर मोठया भांडयात रटारटा खरविज शिजायला लागला. ताराचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिन शेजापाजाऱ्यांना खरविज वाटला.

Leave a Reply

Your email address will not be published.