महाराजांना ठेच लागली नागाने धाव घेतली

बालदास महाराज बाद्याच्या जंगलातून गाई बैलांचा कळप घेऊन सौते गावाकडे येत होते. येताना वाटेत महाराजांना ठेच लागली अंगठा फुटला. महाराज लगेच कुडकुडीचा पाला इकडे तिकडे बघायला लागले. त्यांना कुडकुडीचा पाला मिळाला. तो हातावर चोळून त्यातून त्यांनी रस काढला आणि तो रस व चुरडलेला पाला त्यांनी अंगठयावर घातला. थोडे झोंबले पण रक्‍त लगेच बंद झाले. येवढयात महाराजांना अस्सल नाग समोरच दिसला. तो नाग महाराजांच्यापासून पाच सहा फूट अंतरावर होता.

महाराज त्या नागाला पाहून म्हणाले, “का आलास बाबा धावत धावत?

काय पाहिजे तुला?”

नागाने महाराजांच्यासमोर तीन वेळा फडी आपटली. महाराज हे दृश्य बघून म्हणाले, “अरे बाबा, मला नमस्कार करुन देवपण देतोस काय ? पण मी देव नाही मी एक माणूस आहे. तू येथून निघून जा. पाठीमागे जनावरांचा कळप येतोय. तुला ती तूडवतील. तू तुझ्या जीवाला सांभाळ माझी कशाला काळजी करतोस.”

नाग निघून गेला. महाराज बसलेले उठले आणि सौते मठाकडे चालत येऊ लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.