महाराज चाळीस जनावरांचा कळप घेऊन जंगलात चारायला जात. दिवसभर जनावरांच्या पाठीमागे उभे राहात. संध्याकाळी गावाकडे परतत. डोंगरातून तिन्ही सांजेला जनावरे उतरताना फार काळजीपूर्वक उतरावी लागत. डोंगरातील पाऊल वाटेने एक एक करत जनावर उतरावं लागतं, गडबड करुन चालत नाही. नाहीतर मग कुणीतरी कोलांट्या उडया खात गडगड खाली येतं. मग हात पाय मोडल्या शिवाय राहात नाही. एकदा काय झालं तर सागर बैल मदन बैलाला डोंगराच्या पाऊल वाटेनं घराकडे परत येताना शिंगाने ढकलू लागला. हे बघून महाराज म्हणाले.
“अरे सागर, असं काय करतोस ? मदनला नीट वाटेने चालू दे की, त्याला तू काय म्हणून अडचण करतोस त्याला डोंगराच्या पाऊल वाटेनं नीट सावकाश उतरु दे.”
तू त्याला शिंगाने ढोसनलेस तर तो पडंल हे तुला समजत न्हाय का?”
एवढयात सागराने शिंग मदनच्या मानेला आडवे लावले व मदन धाडकन पडला. महाराज ओरडले, “अरे सागर, तू काय हा घोटाळा केलास? मदनला पाडून तुला काय मिळालं? वाटेनं नीट जावं आपणही नीट चालावं आणि दुसऱ्यालाही नीट चालण्याची संधी द्यावी हे तुला समजत नसेल तर तुझ्यात काय अर्थ नाही.”
खाली ढासळलेल्या मदन जवळ महाराज पळतच गेले आणि त्यांनी मदनची मान वरती उचलली. महाराज त्याला उठवू लागले पण त्याला उठता येत नव्हते. कारण त्याचा पुढचा उजवा पायमोडला होता. पाऊल वाटेने येणारा जनावरांचा कळप तसाच थांबला.
महाराजांनी ताकतीनं मदनला वाटेतून बाजूला ओढून घेतलं. बाकीची जनावरं पाऊल वाटेने चालू लागली. सर्व जनावरे निघून आल्यानंतर महाराजांनी मदनला कसाबसा पायावर उभा केला. त्याच्या पायावर कुठल्यातरी झाडाचा पाला चेचून बांधला आणि मदनला लंगडत लंगडत घेऊन गावाकडे आले.
महाराजांनी दुसऱ्या दिवशी कोकणातून एक वैद्य आणला. त्यानं बैलाचा पाय कामटांच्या साहयाने बांधला. पोटात घेण्यासाठी बाटलीतून औषध दिले ते औषध महाराज वीस एकवीस दिवस पाजत होते. साधारण दोन महिन्यात मदन चालू लागला. त्याचे हाड पूर्णपणे जुळले महाराजांना आनंद वाटला.
ज्या दिवशी मदन चालला त्या दिवशी महाराजांनी मठात सर्व भक्तांना पुरणपोळीचे जेवण दिले. सर्वानाच आनंद झाला.
Leave a Reply