रत्नागिरीतील पार्वती नावाची भक्तीन ठाण्याला राहात होती. वर्षातून एकदातरी ती सौत्याच्या मठात येऊन जायची. महाराज तिला पार्वती माता म्हणून बोलवायचे.
पार्वतीनं त्या काळात म्हणजे सन १९५८ च्या दरम्यान ठाण्यात चार पाच गुंठे जमिन घेतली. जमिन मुरमाड होती. तिला ती जमीन फक्त दोन हजारात मिळाली होती. आजूबाजूला तुरळक वस्ती होती. पाणी व लाईट यांची सोय नव्हती. पण जवळच एक आड होता. त्याचं पाणी शेजारचे लोक बादलीनं काढत पिण्यासाठी नेत. पार्वती भाजीपाला विकून आपलं व नवऱ्याच पोट भरायची.
ती अशीच एके दिवशी मठात आली. महाराजांनी तिला विचारले, “ पार्वती माता, काय म्हणतोय तुमचा भाजीपाला?”
“हाय ते बरचं म्हणायचं महाराज. दोन्ही येळला खातोय हेच नशीब म्हणायचं झालं.”
“आसं कसं म्हणतीस पार्वतीमाता ? पोटभरुन चार पैसे साठलं पाहिजेत नुसतं पोट भरुन चालणार नाही.”
“मग काय करु? दिवसभर भाजीपाल्याची पाटी डोक्यावर घेऊन फिरतोय तवा कुठं हाताला नि पोटाला गाठ पडतीया. आणिक पैसा कुठला साठवू?”
“कसली भाजी विकतेस?”
“साऱ्या प्रकारची.”
“पार्वती माता सारे प्रकार म्हणजे त्या भाज्याची नावे सांग मला.”
“मेथी, पोकळा, वांगी, टॉमाटो, भेंडी, गवार, दोडका, कोबी, फ्लॉवर… हया भाज्या विकते.”
“यापैकी तू ठाण्याला घेतलेल्या जमिनीत काय पिकवतेस?”
“मेथी, पोकळा, भेंडी, पडवळ येवढंच पिकवते. का तर आडाचं पाणी बादलीनं काढून ते भाजीपाल्यांना घालावं लागतं. ते पाणी पण मुबलक मिळत नाही. लई काटकसरीन पाण्याचा वापर करावा लागतो.”
महाराज थोडा वेळ थांबले आणि परत पार्वती मातेला म्हणाले, “ पार्वती माते, मी तुझा भाजीपाला ऐकला तू खूप राबतेस माझ्या लक्षात आले. तर आता तू हा सारा धंदा बंद कर.”
“मग काय करु?”
“मी सांगतो ते कर.”
“बरं तर काय करु म्हणता महाराज?”
“माझ्याकडे चार आळवाचे गड्डे आहेत. ते तू घेऊन जा देशी आळू आहेत. फार चवीला असतात. त्याच्या पानाचं व देठाचं उत्तम गरगटे होते. त्याच्या पानाच्या छान वडया होतात. हे आळुचे गड्डे तू ठाण्याच्या जमिनीत नेऊन लाव. हे आळू साऱ्या ठाण्याच्या लोकांना रुचीचे वेड लावतील.”
“बरं तर महाराज तुमच्या मताप्रमाणे चालूया.”
“पार्वती माता मी सांगतो तसंच कर. आता अधिक काय बोलायला नको.”
पार्वती मातेने ते आळुचे गड्डे ओल्या फडक्यात गुडांळून घेतले. दुसऱ्या दिवशी ते देशी आळूचे गड्डे तिने ठाण्याच्या जमिनीत लावले. आळूने आळू वाढत गेले आणि चार गुंठे रान हिरवे गार झाले. पार्वतीची आळुच्या पानाने भरलेली पाटी ठाण्यात फिरु लागली. आळुच्या चवीची प्रसिद्धी सगळीकडे झाली. ठाण्याचे लोक तिच्या चार गुंठे जमिनीकडे येऊन पाने विकत नेऊ लागले. सुरुवातीला ती दोन रुपायला सहा-सात पाने विकत होती. तीच पार्वती तीच आळवाची पाने दोन रुपायाला एक पान असे विकू लागली.
हा महाराजांच्या सांगण्याप्रमाणे तिने निष्ठेने व्यवसाय केला. काही वर्षातच तिची चार गुंठयातील झोपडी जाऊन तिथे बंगला उभा राहिला. तिनं शेजारचा शिवार थोडा थोडा खरेदी करण्यास प्रारंभ केला. कष्टाळू व धनवान बाई म्हणून तिची सर्व ठाण्यात ख्याती झाली. महाराजांची वाचा सोन्याची ठरली.
Leave a Reply