चांगल्या बोलण्याचे चांगले फळ मिळते

महाराज एकदा सांबवे पासून मलकापुराकडे चालत निघाले होते. तेव्हा वाटेत मक्‍याचे पिक त्याना डोलताना दिसले. त्या पिकात एक शेतकरी पाणी पाजत असलेला दिसला. महाराजांनी त्या शेतकऱ्याला हाक मारली आणि विचारले, “अरे बाबा हे मक्‍याचे पिक कितीतरी चांगले आणले आहेस. मक्‍याचे कणीस केवढे केवढे मोठे आहे. एका एका कणसाला मापटेभर दाणे होतील. तू खरचं चांगले कष्ट केले आहेत. तुझ्या कष्टाचे चांगले फळ देवाने दिले आहे.” त्यावर तो शेतकरी म्हणाला, “यात काय सांगताय महाराज. माझ्या कष्टामुळे माझे खळे भरुन मके होणार आहेत. तुमच्या बोलण्यामुळं नव्हं. महाराजांना त्या शेतकऱ्यांचे उर्मट बोलने आवडले नाही. महाराज म्हणाले, “तुझे खळयातील मके भरुन नेण्यास चांगल्या चार बैलगाडया सांग.” असे म्हणून महाराज रागाने तेथून निघून गेले. त्या शेतकऱ्यांचा मका एका रात्रीत जनावरांनी खाल्ला. पाच मकेही त्याला झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले की महाराजांच्या क्रोधामुळे आपले पिक गेले. त्या शेतकऱ्याने महाराजांकडे जाऊन आपल्या उर्मट बोलण्याची माफी मागितली. महाराज त्याला म्हणाले, “नेहमी चांगले बोलावे कारण चांगल्या बोलण्याचे नेहमीच चांगले फळ मिळते. वाईट बोलण्याचे वाईट फळ मिळते.”

Leave a Reply

Your email address will not be published.