पश्‍चात्ताप झाला की पाप दूर पळते

एके दिवशी एक भक्‍त उजडायला महाराजांच्या मठात आला. त्याला महाराज म्हणाले, “अरे बाबा, एवढया लवकर का आलास? अगोदर तू मुंबईसनं कधी आलास ते सांग” भक्‍त म्हणाला, “आत्ताच मुंबईहून आलो. एस.टी. तून उतरलो आणि पायपीट करीत तुमच्याकडं आलोय. महाराज म्हणाले घागरीतील पाणी घेऊन तोंड धू. तुला चहा देतो. चहा घे आणि मग माझ्या बरोबर बोल.”

महाराज मी वैतागून गेलोय. मन:शांतीसाठी तुमच्या दर्शनासाठी आलोय. महाराज “तुला वैतागायला काय झालंय ?”

भक्‍त “मी दारु, मटका, जुगार, या जंजाळात बुडून गेलोय, या साऱ्या वागण्याचा माझा मलाच वीट आला आहे. हे सारं आता गंगेत बुडवून टाकतो.”

महाराज शांतपणे म्हणाले, “अरे बाबा केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप होणं म्हणजेच तुझं मनं चांगल्या वाटेने, चालले आहे असा याचा अर्थ होय.”

महाराज- “तू आजपासून माणूस म्हणून वाग. माणूस म्हणून जग. राक्षसासारखं वागू नकोस. तुझ्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे वाटोळे करु नकोस. तू चांगला वाग आणि इतरांना चांगले वागण्यास शिकवं.”

त्या भक्ताने महाराजांच्या पासावर डोके ठेवले आणि म्हणाला, “महाराज ,मी आजपासून चांगला वागेन, चांगला माणूस म्हणून समाजात जगेन. वाईट धंदे करणार नाही.”

महाराजांना त्याने केलेल्या प्रतिज्ञेचा आनंद वाटला. महाराजांनी त्याला थांबवून घेतले. चहा दिला. एवढेच नव्हे तर महाराजांनी त्याला मठात थांबवून घेतले. स्वतः वरण भात करुन जेऊ घातले. तो भक्‍त तेथून मुंबईला परत गेला. एक चांगला उद्योगपती म्हणून जीवन जगू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.