एकदा एक भक्त महाराजांच्या सेवेत गुंतल्यामुळे त्याच्या पेरणीस वेळ झाला. गावातील इतर लोकांनी भाताची पेरणी मे मध्येच धुळवाफेनं केली पण महाराजांच्या सेवेत संपूर्ण मे महिना गेल्यामुळे शेताची मशागत करण्यासाठी त्या भक्ताला वेळ अजिबात मिळाला नाही. जूनमध्ये शेतीची मशागत पहिल्याच आठवडयात त्या भक्ताने केली आणि दुसऱ्या आठवडयात पेरण्यास गेला. कुरीने भात पेरत असताना इतर शिवार मात्र भात उगवून डौलत होता. त्यामुळेच शेजारचा एक पाटील म्हणाला,
“अरे ये, महाराजांच्या भक्ता! तुला काय भात पेरायची बरी येळवर आठवण झाली रं. आता तरी कशाला पेरतोस. महाराजांच्या मागनं वीणा घेऊन, टाळ घेऊन फिर की सेवा करीत. त्यावर तो भक्त नम्रतेनं म्हणाला,
“महाराजांची सेवा म्हणजे शेवटी माणसाचीच सेवा न्हवं. आणि शिवाय पाटील साहेब, हे लक्षात घ्या ज्यांच्यापासून चार धडे चांगले संत मार्गातले शिकायला मिळतात. ती व्यक्ती आपण गुरु स्थानीच मानली पाहिजे. महाराज हे आम्हांला महाराज वाटत नसून तो एक परमेश्वर – बोधामृताचा सागरच वाटतो यात बिघडलं कुठं ?”
परत पाटील कुऱ्यात म्हणाले, “आरं पण महाराजांच्या नादानं काय जमिनी ओसाड पाडायच्या काय?”
हे बोचणारं वाक्य ऐकून भक्त म्हणाला, “महाराजांची कृपा असेल तर माझं भाताचं पीक चांगलच येईल. हेही पाटील साहेब लक्षात ठेवा.”
पेरणी झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या भक्तानं घडलेली चर्चा महाराजांना संतापानं सांगितली. महाराज म्हणाले,
“भक्तां! तुझ्यावर निसर्गाची कृपा राहील. अधीक कशाला बोलू.”
नंतर खरोखरच इतरांचा उगवून आलेला शिवार पावसानं दडी मारल्यामुळे तीन आठवडयात वाळून गेला आणि तीन आठडयानंतर पडलेल्या पावसामुळं भक्ताचा शिवार (भक्ताचं शेत) आस्मानाकडे बघून हसू लागलं. नंतर वेळेवर मेघराजा पडत गेला त्या भागात त्या भक्तानंच धान्याची रास खळयात तयार करुन घरला नेली.
Leave a Reply