शिक्षण माणसाचा तिसरा डोळा

एकदा गौरी नावाच्या मुलीला तिच्या आईनं ती शाळेला जाईना म्हणून खूप मारलं. ती मुलगी रडत रडत महाराजांच्या जवळ आली. महाराजांनी तिला विचारले, “तु का रडतेस बाळ?”

त्या प्रश्‍नाला उत्तर देताना गौरी जास्तच रडू लागली. जोरानं हुंदके देऊ लागली. महाराजांनी तिला पोटाशी धरलं आणि म्हणाले “तुला कुणी मारलं ते सांग. मारणाऱ्याला मी खूप मारतो पण तुझं रडं तेवढं बंद कर.”

हे ऐकून गौरी म्हणाली, “मला माझ्या आईनं मारलं.”

महाराजम्हणाले, “का मारलं ? तू तिचं काय केलंस?”

गौरी खाली मान घालून पायाच्या नखांनी जमीन टोकरत म्हणाली, “म्या – म्या शाळेला जाईना म्हणून मला लई लई झोडपलं.”

महाराज हसत हसत तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, “हात तेच्या मारी, येवढयासाठीच न्हवं? बाळ मग तू हे लक्षात घे की या जगात शाळा शिकल्याशिवाय किंमत नाही. तू शाळा शिकली नाहीस तर तुझी एक पिढी बरबाद होईल! “अडाणी आई घर वाया जाई.” हे लक्षात ठेव. तू शाळा जर शिकलीस तर तुला चांगला नवरा मिळेल. शेतावर भांगलाय, टोंगलाय जायला लागायचं नाही.

चांगली सायबाची बायको म्हणून घरातनं बाहेर निघायची नाहीस. आईनं तुला मारलं ते चांगल्या साठीच मारलंय. पण तिची चूक एवढीच की इतकं मारायला नको होतं. तरीपण मी तुझ्या आईला सांगतो की पोरीला मारायच्या पद्धतीनं मारत जा. तू जर तिचं ऐकलंस तर ती तुला कधीच मारणार नाही. पण बाळ शाळेला नियमितपणे जायचं बघं. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.

गौरीला सारं पटलं. गौरी हसतच घराकडं निघून आली आणि मुकाटयानं दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला लागली.

Leave a Reply

Your email address will not be published.